"एचआरसीटी चेस्ट' तपासणीसाठी दर निश्‍चित : डॉ. अभिजीत चौधरी... अधिक दर आकारल्यास कारवाई 

घनश्‍याम नवाथे
Friday, 25 September 2020

सांगली-  "सीटी स्कॅन' तपासणीसाठी खासगी रूग्णालये किंवा सीटी स्कॅन तपासणी तपासणी केंद्रांकडून अवाजवी रक्कम आकारली जात असल्याबद्दल तक्रारी होत होत्या. या पार्श्वभूमीवर रूग्णांच्या "एचआरसीटी चेस्ट' चाचणीचे दर शासन नियुक्त समितीने निश्‍चित केले आहे. त्याबद्दल शासन निर्णय जाहीर केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. 

सांगली-  "सीटी स्कॅन' तपासणीसाठी खासगी रूग्णालये किंवा सीटी स्कॅन तपासणी तपासणी केंद्रांकडून अवाजवी रक्कम आकारली जात असल्याबद्दल तक्रारी होत होत्या. या पार्श्वभूमीवर रूग्णांच्या "एचआरसीटी चेस्ट' चाचणीचे दर शासन नियुक्त समितीने निश्‍चित केले आहे. त्याबद्दल शासन निर्णय जाहीर केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. 

राज्यात सर्वसाधारणपणे 16 ते 64 स्लाईस क्षमतेच्या मशिन्स "एचआरसीटी' साठी वापरण्यात येतात. त्या मशिनच्या क्षमतेनुसार "एचआरसीटी चेस्ट' तपासणीसाठी कमाल दर मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. 16 स्लाईस सीटी पेक्षा कमी मशिन्ससाठी दोन हजार रूपये, मल्टी डिटेक्‍टर सीटी 17 ते 64 स्लाईससाठी अडीच हजार रूपये, तर मल्टी डिटेक्‍टर सीटी 64 स्लाईस पेक्षा जास्त मशिन्ससाठी तीन हजार रूपये इतका दर शासन निर्णयानुसार निश्‍चित करण्यात आला आहे. या कमाल रकमेत सी.टी.स्कॅन तपासणी, तपासणी अहवाल, सी.टी. फिल्म, पी.पी.ई. किट, डिसइन्फेक्‍टंट चार्जेस व जीएसटी चा समावेश केला आहे. 

एचआरसीटी चेस्टच्या नियमित व तातडीच्या तपासणीसाठी समान दर लागू राहतील. शासन निर्णय होण्यापूर्वी जर कोणत्याही रूग्णालय किंवा तपासणी केंद्राचे तपासणी दर यापेक्षा कमी असल्यास, कमी असलेले दर तपासणीसाठी लागू राहतील. तपासणी केल्यानंतर अहवालावर कोणत्या सी.टी.मशिन्सद्वारे तपासणी केली, त्याचा उल्लेख नमूद करणे बंधनकारक आहे. सध्या डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय तपासणी करण्याची मागणी रूग्णांचे नातेवाईक करतात. परंतू त्यामध्ये किरणोत्सर्जनद्वारे तपासणीमुळे जोखीम असते. त्यासाठी नोंदणीकृत डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय तपासणी करू नये. रेडीओलॉजिस्टने संपूर्ण तपासणी अहवाल देणे आवश्‍यक असेल. 

ज्या रुग्णांकडे आरोग्य विमा योजना किंवा एखाद्या रुग्णालयाने किंवा कार्पोरेट / खासगी कंपन्यांनी तपासणी केंद्राशी सामंजस्य करार केला असेल तर त्यासाठी हे दर लागू राहणार नाहीत. सर्व रुग्णालये आणि तपासणी केंद्रांनी तपासणीसाठी निश्‍चित केलेले दर मशिनच्या प्रकारानुसार दर्शनी भागात लावणे लावणे बंधनकारक आहे. निश्‍चित दरापेक्षा अधिक दर आकारल्यास संबंधितावर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि महालिका क्षेत्रात आयुक्तांना अधिकार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rates fixed for HRCT Chest Inspection: Dr. Abhijeet Chaudhary. Action will be taken if more rates are charged

Tags
टॉपिकस
Topic Tags: