रेशनवर धान्य वितरण आता बायोमेट्रिकने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

मार्चअखेर प्रणाली सर्वत्र लागू होणार; परवानाधारक रॉकेल विक्रेते बॅंकिंग प्रतिनिधी  
कोल्हापूर - रेशनवरील धान्याचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी राज्यातील रास्त धान्य दुकानात वितरण व्यवस्थेत ‘बायोमेट्रिक पद्धती’चा वापर होणार आहे. मार्चअखेर सर्वत्र ही प्रणाली लागू होणार आहे. तसेच रास्त भाव धान्य दुकानदार व परवानाधारक किरकोळ रॉकेल विक्रेत्यांना बॅंकेचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणूनही काम करता येणार आहे.  

मार्चअखेर प्रणाली सर्वत्र लागू होणार; परवानाधारक रॉकेल विक्रेते बॅंकिंग प्रतिनिधी  
कोल्हापूर - रेशनवरील धान्याचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी राज्यातील रास्त धान्य दुकानात वितरण व्यवस्थेत ‘बायोमेट्रिक पद्धती’चा वापर होणार आहे. मार्चअखेर सर्वत्र ही प्रणाली लागू होणार आहे. तसेच रास्त भाव धान्य दुकानदार व परवानाधारक किरकोळ रॉकेल विक्रेत्यांना बॅंकेचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणूनही काम करता येणार आहे.  

सर्वसामान्यांपर्यंत अन्नधान्याचा पुरवठा सुलभ व्हावा, तसेच बॅंकिंग व्यवहारही नियमितपणे होण्यासाठी या दोन्ही सेवा रास्त भाव दुकानात चालविण्यात येणार आहेत. राज्यातील ५१ हजार रास्त भाव दुकानात पॉस मशीन (पीओएस- पॉईंट ऑफ सेल) बसविले जाणार आहेत. त्याद्वारे धान्य खरेदीला येणाऱ्या ग्राहकांचे बायोमेट्रिक करूनच त्याला धान्य वितरण करता येणार आहे. यामुळे जो खरा लाभार्थी आहे त्यालाच धान्य मिळणे शक्‍य होऊन धान्य दुकानातील गैरप्रकारांना आळा बसणार आहे.

याशिवाय रास्त धान्य दुकानदार व रॉकेल विक्रेत्यांना यापुढे बॅंकेचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बॅंकेच्या कामासाठी पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रास्त भाव दुकानात बॅंकेची रक्कम भरणे, वितरित करणे, विमा पॉलिसी, म्युच्युअल फंड, पेन्शन फंड, असे व्यवहार करता येणार आहेत. रास्त भाव दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण वेळीच व नियमित व्हावे, वितरण व्यवहारात पारदर्शकता यावी, यासाठी या विभागाचे संगणकीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे ५४ हजार ९३० धान्य दुकाने, ६० हजारांवर रॉकेल परवाने, ४८८ गोदाम व गॅस एजन्सी यांची माहिती संगणकीकृत करण्यात आली आहे. याशिवाय शिधापत्रिका, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, बॅंक क्रमांकासह डाटा बेसमध्ये समाविष्ट करण्याचे काम सुरू आहे. यात ६.२५ कोटी लाभार्थ्यांची आधार क्रमांक जोडणी पूर्ण झाली आहे. आगामी काळात शिधापत्रिकाधारकांना धान्य व रॉकेलची माहिती एसएमएसद्वारे मोबाइलवर देण्याची सुविधाही लवकरच सुरू होणार आहे.

शिधापत्रिकांची आधार कार्ड क्रमांकाशी जोडणी केली जात आहे. त्यामुळे ज्यांची दुबार नावे आहेत, अशी नावे कमी होणार आहेत. त्यामुळे अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित राहिलेल्या ९२ लाख केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश होईल. यातून ग्रामीण भागात ४८ लाख तर शहरी भागात ४४ लाख लाभार्थ्यांचा समावेश होईल.

‘अनुदानातून बाहेर पडा’ योजना...
शिधापत्रिकेवरील धान्य लाभार्थी घेत नाहीत तेच धान्य गरजू लोकांना मिळावे, यासाठी ‘गिव्ह इट अप’ ही योजना सुरू केली आहे त्याला ‘अनुदानातून बाहेर पडा’ असे नाव देण्यात आले आहे. ज्यांना रेशनचे धान्य नको आहे त्यांना आपले धान्य स्वेच्छेने नाकारण्याचा पर्याय या योजनेत दिला आहे. त्यातून बचत होणारे धान्य गरजूंना देण्यात येणार आहे.

Web Title: ration grain distribution on biometric system