ramchandra sankpal.jpg
ramchandra sankpal.jpg

रेशनची सेवा 52 वर्षे, ना दाग ना धब्बा... एका रेशन धान्य दुकानदाराची निवृत्ती 

सांगली-  थोडी नव्हे तर तब्बल 52 वर्षे ते रेशन धान्य दुकानात सेल्समन होते. सचोटीने त्यांनी काम केले. ना ग्राहकांची, ना पुरवठा विभागाची तक्रार. सांगलीतील गावभागासारख्या चिकित्सक वस्तीत. रामचंद्र संकपाळ त्यांचं नाव. परवा खासगी क्षेत्रातील दीर्घ सेवेला त्यांनी स्वेच्छेने राम राम केला

. रेशनिंग व्यवस्था नेहमीच तक्रारीच्या फेऱ्यात अडकलेला. नेहमीच आरोपांच्या फैरींनी घायाळ होणारी व्यवस्था. तिथंच त्यांनी सचोटीने अर्धशतक भरेल इतकी वर्षे काम केले. हे कोळशाच्या वखारीत काम करुन "ना दाग, ना धब्बा' अशा अवस्थेत बाहेर पडण्यासारखे. स्वच्छ सेवेचे चारित्र्य घेऊन, कोणत्याही आरोग्यविषयक व्याधीशिवाय ते सध्या निवृत्तीचे जीवन जगत आहेत. हे सहजशक्‍य नव्हतं. पण त्यांनी ते केलं. यावर कदाचित विश्‍वासही बसणार नाही, पण हे खरं आणि सोळा आणे सच. 

सांगली अर्बन बॅंकेचे संस्थापक आण्णासाहेब गोडबोले यांनी सहकारी तत्वावर गावभागात दोन रेशन दुकाने सुरु केली. सहकारी ग्राहक भांडारच्या दुकान क्रमांक एकमध्ये सन 1968 मध्ये ते सेल्समन म्हणून रुजू झाले. शिरोळ तालुक्‍यातील कवठेसार त्यांच गाव. जगण्यासाठी बहिणीकडे आले. कायमचे सांगलीकर झाले. ते रूजू झाले तेंव्हा 1300 कार्डधारक होते. बटाटे, गहू, लिसा, डाळ, पामतेल असं किराणा साहित्य विकले जायचे. सन 1977 पासून रॉकेल वितरण सुरू झाले. दिवाळीला दुकानासमोर रांग लागे. लोकांना हक्काचे धान्य मिळेपर्यंत संकपाळ काम करीत. सर्वधर्मियांना त्यांच्या सणांप्रमाणे प्राधान्य दिलं जायचं. त्यांचा हा शिरस्ता कोरोना काळातही कायम राहिला. गतवर्षी महापुरावेळी त्यांनी प्राणाणिकपणे कणभर धान्याचे नुकसान झाले नाही म्हणत भरपाई घेतली नाही. 

वारकरी असलेले श्री. संकपाळ म्हणाले,""सरकारच्या तुटपुंज्या कमीशनवर रेशन दुकानदाराचा संसार अवघडच. तीन मुलांच्या जबाबदारीसह संसार गाडा ओढताना अडचणी आली. आयुष्यभर काटकसर, चिकाटीने जगलो. रणझुंजार चौकात कोपऱ्यावर रामकृष्ण पोतदार यांच्या खोलीत 25 वर्षे राहिलो. घर सोडताना कोणतीच अपेक्षा ठेवली नाही. मुलं स्थिरस्थावर आहेत. निरोगी आयुष्याची पंच्याहत्तरी आली. कधी तरी थांबायला हवं.'' 

माजी आमदार संभाजी पवार, वासुदेव जोशी, लाला पवार, बाळासाहेब गलगले, टी. पी. खेमलापुरे, उल्हास लिमये, अनिल लिमये, भुपाल कांबळे, रावसाहेब कबाडे आणि अलीकडे केदार खाडीलकर अशांचे सहकार्य मिळाले. "तक्रारीचे बोट येणार नाही' हे त्यांनी आयुष्यभर जपले. यावर्षीही निर्दोष ऑडीट करून "चांगला' असा शेरा घेऊन दुकान सोडले. हाच आनंदाचा क्षण.'' 

संपादन : घनशाम नवाथे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com