रत्नाई कृषी महाविद्यालयाची कृषिकन्या शेतकऱ्यांना देतेय बोर्डो पेस्टचे प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

बोर्डो पेस्ट ही लिंबूवर्गीय फळे, डाळिंब, नारळ यांसारख्या पिकांवरील बुरशी, तसेच झाडांच्या बुंध्यातून निघणारा डिंकासारख चिकट द्रव यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरतात. 

अकलूज : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूजची कृषिकन्या रुपाली शिवाजी लांडगे हिने निरनिमगाव (ता.इंदापूर) येथील शेतकऱ्यांना बोर्डो पेस्ट तयार करणे आणि त्याचा वापर कसा करावा याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रुपालीने या सर्व प्रात्यक्षिकांचे आयोजन शेतकऱ्यांच्या शेतात केले होते. यावेळी तिने बोर्डो पेस्ट का आणि कशासाठी वापरावी, याची सविस्तर माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. बोर्डो पेस्ट ही लिंबूवर्गीय फळे, डाळिंब, नारळ यांसारख्या पिकांवरील बुरशी, तसेच झाडांच्या बुंध्यातून निघणारा डिंकासारख चिकट द्रव यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरतात. तसेच छाटणीनंतर झाडाला झालेल्या जखमांमधून विषाणू झाडामध्ये प्रवेश करतात. या सर्व कारणांमुळे पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. म्हणूनच या सर्व अडचणींवर मात करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी रुपालीने या प्रात्यक्षिकाची निवड केली. 

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रुपाली म्हणाली, ही पेस्ट तयार करण्यासाठी २  प्लास्टिकच्या बादल्या घ्याव्यात. एका बादलीत १ किलो मोरचूद ५ लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालावे आणि दुसऱ्या बादलीत १ किलो कळीचा चुना ५ लिटर पाण्यात भिजत घालावा. दुसऱ्या दिवशी ही दोन्ही मिश्रणे गाळून एकत्र करून एकजीव करून घ्यावीत. मिश्रणे एकत्र करताना सतत काठीने ढवळत राहावे. हे झाल्यानंतर त्या पेस्टचा पीएच चेक करावा. तो न्युट्रल असल्याचे समजल्यानंतर एका ब्रशच्या साहाय्याने ती पेस्ट झाडाच्या बुंध्याला लावावी. डिंकग्रस्त फळझाडाची साल धारदार निर्जंतुक केलेल्या चाकूने काढून रोगट भाग १% पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणाने निर्जंतुक करावा आणि त्यावर बोर्डो पेस्ट लावावी.

या प्रात्यक्षिकासाठी विषय शिक्षक डॉ. डी. एस. ठवरे आणि प्रा. आर. व्ही. कणसे यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, समन्वयक डॉ. डी. पी. कोरटकर, प्राचार्य आर. जी. नलवडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. एस. आर. आडत, प्रा. डी. एस. मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnai Agricultural College student Rupali Landage trained farmers about Bordeaux paste