शेताच्या बांधावरही वडापाव पोहच; पार्सल सुविधेला ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद 

अनिल पाटील
Tuesday, 7 July 2020

सूचनांचे पालन करुन भजी, भडंग, भेळ, चहा, समोसा आणि वडापाव हे पदार्थ आता नागरिकांना घरबसल्या खायाला मिळत आहेत. 

सलगरे (सांगली) : कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरु झाला आहे. शहरी भागात हॉटेल व्यावसायिकांकडून विविध कंपन्यांच्या घरपोच सुविधा सुरू असताना आता ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिकांनी फोनव्दारे ऑर्डर घेवून घरपोच सेवा सुरू केली आहे. यामुळे मिरज पूर्व भागातील काही गावात शेतकऱ्यांच्या बांधवरही वडापाव पोहच होवू लागला आहे. 

मिरज पूर्व भागातील भरणारे आठवडा बाजार बंद, किराणा दुकानदार, अडत व्यापार बंद, सलून दुकाने बंद, मंडप, स्पीकर, लाईटींग आणि वाद्यांच्या निनादात होणाऱ्या लग्नसमारंभावर मर्यादा घातल्याने मंडप व्यावसायिक,आचारी काम करणाऱ्यांना लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ निर्माण झाली होती.

या दरम्यान पारंपरिक व्यवसाय सोडून बागांमध्ये मजुरीसाठी जाण्याची वेळ आली आहे. तसेच सर्वात मोठे नुकसान झाले ते हॉटेल व्यवसायाचे लॉकडाऊन शिथिल होईपर्यंत व्यवसाय बंदच होते. शिथिल झालेनंतर मात्र प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हॉटेल व्यावसायिकांना डिस्टन्स ठेऊन, सूचनांचे पालन करुन भजी, भडंग, भेळ, चहा, समोसा आणि वडापाव हे पदार्थ आता नागरिकांना घरबसल्या खायाला मिळत आहेत. 

चहाचा स्वादही शेतात बसून 
लॉकडाऊन पासून हॉटेल आणि नाष्टा सेंटर वाल्यांनी मोबाईल वरुन चहा, वडापावची ऑर्डर दिल्यास तातडीने जागेवर पार्सल सुविधा दिली जात आहे. वडापाव आणि चहा जागेवर येऊन मिळत असल्याने शेतातील मशागतीची कामे करणारा शेतकरी मोबाईल वरुन ऑर्डर देऊन वडापाव ची चव घेत असल्याचे चित्र सलगरेत दिसत आहे. पिझ्झा, बर्गर, झोमॅटो प्रमाणेच ग्रामीण भागात लॉकडाऊन मुळे वडापाव शेतकऱ्यांच्या बांधावर मिळत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reach Vadapav on the farm dam too; Good response to parcel facility in rural areas also