
सांगली ः पुनर्रचनेतून महापालिकेतील चारही प्रभाग समित्या ताब्यात घेण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने पूर्ण तयारी केली आहे. पुढील महिन्यात नव्या रचनेनुसारच प्रभाग समित्यांसाठीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यावेळी भाजपला आणखी एक धक्का देण्यासाठीची व्यूहरचना आखण्यात आली आहे.
रस्ते, गटार, स्वच्छता, औषध फवारणी अशा दैनंदिन कामांबाबतच्या तक्रारींचा निपटारा आणि निर्णय तत्काळ व्हावेत. प्रभागातील नागरिकांना तक्रारीसाठी थेट व्यवस्था व्हावी यासाठी व्यवस्था म्हणजे प्रभाग समित्या. महापालिका क्षेत्राचे चार भाग करून त्यामध्ये सर्व 78 नगरसेवकांची विभागणी करून त्यांना या समित्यांमध्ये समाविष्ट केले जाते. या समित्या करतेवेळी प्रभागांची भौगोलिक सलगता लक्षात घेऊन रचना केली जाते. ती करताना कोणत्या प्रभागात आपले किती नगरसेवक आहेत आणि तिथे आपले बहुमत आहे याची खातरजमा करून प्रभागांची रचना केली जाते.
हे काम प्रशासन करीत असले तरी ते सत्ताधाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे होत असते. सरासरी 16 ते 23 नगरसेवकांच्या सहभागाने एक समिती असते. या लवचिकतेमुळे पक्षीय बळ विचारात घेऊनच प्रभाग समितीचे क्षेत्र ठरवले जाते. या प्रभाग रचनेस महासभेत मंजुरी घेऊन त्यांच्यातील सदस्यांमधून सभापती निवडला जातो. सभापती दरमहा बैठका घेऊन प्रभाग समित्यांच्या क्षेत्रातील सुमारे पाच लाखांपर्यंतची कामे प्रभाग समिती स्तरावर बंद लिफाफा किंवा निविदा काढून कामे करीत असतात. महापालिकेतील सत्ता एका अर्थाने गल्लीबोळापर्यंत राबवण्याची ही एक व्यवस्थाच आहे.
गेल्या निवडणुकीनंतर भाजपचे 41 आणि दोन अपक्ष असे 43 सदस्यांचे बळ होते. महापौर-उपमहापौर निवडी दरम्यान भाजपचे सात सदस्य फुटले होते. या फुटीर सदस्यांनी नुकत्याच झालेल्या विशेष महासभेतही आघाडीचे समर्थन सुरुच ठेवले आहे. याशिवाय विशेष महासभेत भाजपने दिलेल्या दोन निवेदनांवर 31 आणि 33 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. फुटीर सात सदस्यांशिवाय आणखी काही सदस्य आघाडीच्या गळाला लागले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता बळावर आणि नव्याने सोयीची प्रभाग रचना करून चारही समित्या ताब्यात घ्यायचे कॉंग्रेस आघाडीचे मनसुबे आहेत.
मिरजेतील प्रभाग 4 मध्ये शिवाजी दुर्वे, आनंदा देवमाने, कुपवाडमधील प्रभाग 3 मध्ये विजय घाडगे, विश्रामबाग विस्तारित भागाचा समावेश असलेल्या सांगलीतील प्रभाग 2 मध्ये बाळासाहेब सावंत, नसीमा नाईक, स्नेहल सावंत आणि सांगलीतील गावभाग-सांगलीवाडीच्या प्रभाग समिती क्रमांक 1 मध्ये अपर्णा कदम यांचा समावेश आहे. हे सर्व भाजपपासून दूर गेलेले सदस्य आहेत. आता या सदस्यांच्या मदतीबरोबरच आणखी काही सदस्यांच्या मदतीने प्रत्येक प्रभाग समितीत बहुमत करण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे.
31 मार्चला विद्यमान समित्यांची मुदत संपली आहे. नव्या निवडी नव्या रचनेनुसार करण्यासाठीच विशेष महासभा बोलवण्यात आली होती. नव्या रचनेला भाजपने आक्षेप घेतला आहे. तथापि तो कायद्याच्या पातळीवर टिकणारा नाही. त्यामुळे प्रभाग समित्या टिकवण्यासाठी भाजपला स्वसदस्यांना पुन्हा वश करणे एवढाच उपाय उरतो. जे सध्या तरी अशक्य आहे. त्यामुळे भाजपला आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
व्हीप लागतो.. पण?
फुटीर सदस्य अजूनही भाजपचेच कायद्याने सदस्य आहेत. ते अद्याप अपात्र ठरलेले नाहीत. व्हीप बजावण्याचा अधिकार सर्वच पक्षांच्या गटनेत्यांना आहे. त्यातले तांत्रिक बारकावे तपासून प्रभाग समित्यांच्या निवडणुकीसाठीही व्हीप बजावला जाऊ शकतो. फुटीर सदस्यांनी आजारी असणे, तांत्रिक उणिवामुळे मतदान दुसरीकडे गेले असा पवित्रा घेतला आहे. प्रभाग समित्यांच्या निवडीही ऑनलाईन झाल्यास पुन्हा तीच किंवा तत्सम स्वरूपाची कारणे दिली जाऊ शकतात. ही सारी भाजपपुढील आव्हाने आहेत.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.