
सांगली जिल्ह्यात यंदा 15 सहकारी व खासगी कारखान्यांनी गळीत हंगामास प्रारंभ केला आहे. दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून 40.18 लाख टन उसाचे गाळप झाले असून 45 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
सांगली : जिल्ह्यात यंदा 15 सहकारी व खासगी कारखान्यांनी गळीत हंगामास प्रारंभ केला आहे. दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून 40.18 लाख टन उसाचे गाळप झाले असून 45 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी उतारा 11.16 इतका आहे. बंद पडलेला जत, तासगाव आणि यशवंत कारखाना यंदा सुरू झाले आहेत. हंगाम संपण्यास जवळपास तीन महिन्यांचा कालावधी असून यंदा विक्रमी साखर उत्पादन होईल अशी परिस्थिती आहे.
यंदा परतीच्या पावसाने उशिरापर्यंत मुक्काम ठोकल्यामुळे साखर कारखान्यांचा हंगाम उशिराने नोव्हेंबर महिन्यात सुरू झाला. कोरोनाच्या सावटामध्ये दिवाळीनंतर हंगामास खऱ्या अर्थाने सुरवात झाली. परंतु मजुरांची टंचाई जवळपास सर्वच कारखान्यांना भेडसावत आहे. मजुरांची टंचाई असताना दुसरीकडे शेतकऱ्यांकडून ऊसतोडीसाठी जादा रकमेची मागणी करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. परंतु वेळेत ऊसतोड आवश्यक असल्यामुळे बरेच शेतकरी जादा पैसे देऊन ऊसतोड करून घेत आहेत.
ऊसतोड वेळेत करण्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होत असतानाच यंदा एफआरपीचा प्रश्न निर्माण झाला आहे. साखर कारखान्यांनी सुरवातीला झालेल्या बैठकीत एकरकमी एफआरपी देण्याचे कबूल केले. परंतु बाजारातील साखरेची कमी किंमत आणि शिल्लक साखर आदी बाबींमुळे एकरकमी एफआरपी देणे शक्य नसल्याचे साखर कारखाने सांगत आहेत.
सुरवातीला तीन कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली. त्यानंतर आंदोलनामुळे दोन कारखाने तयार झाले. परंतु इतर कारखान्यांनी तुकड्यात एफआरपी देण्यास सुरवात केली आहे. सध्या हा प्रश्न अधांतरीच आहे. जिल्ह्यात यापूर्वी बंद पडलेले जत, तासगाव आणि यशवंत कारखान्यांनी यंदा हंगामास प्रारंभ केला आहे. त्याचे गाळप आणि उत्पादन मात्र अद्याप कमी आहे.
दोन महिन्यांच्या कालावधीत 40.18 लाख टन उसाचे गाळप झाले असून 45 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. अद्याप तीन महिने साखर कारखाने सुरू राहतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे यंदा अधिक साखर उत्पादन होईल अशी परिस्थिती आहे.
संपादन : युवराज यादव