esakal | खडतर संघर्षातून अग्रणीचे पुनरुज्जीवन : संपतराव पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Rehabilatation of Agrani river through fierce struggle; Sampatrao Pawar

दुष्काळी खानापूर तालुक्‍यातील अनेक वर्षांपासून लुप्त पावलेली अग्रणी नदी लोकसहभाग व प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे वाहती झाली.

खडतर संघर्षातून अग्रणीचे पुनरुज्जीवन : संपतराव पवार

sakal_logo
By
दीपक पवार

दुष्काळी खानापूर तालुक्‍यातील (जि. सांगली ) अनेक वर्षांपासून लुप्त पावलेली अग्रणी नदी लोकसहभाग व प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे वाहती झाली. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने या प्रयत्नांचा गौरव केला. अग्रणी नदी पुनरुज्जीवनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांच्याशी साधलेला संवाद.... 

प्रश्न : अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनाचा विषय कसा पुढे आला? 

श्री. पवार : खानापूर तालुक्‍याच्या घाटमाथ्यावर अनेक वर्षांपासून लुप्त असणाऱ्या अग्रणी नदीवर "बळिराजा'सारखे धरण बांधा, अशी मागणी होती. 2013 मध्ये जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी पुण्यात पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मीही होतो. राजेंद्रसिंहांनी राजस्थान मधील अलवरी नदी पुनरुज्जीवनाची मांडणी केले. त्याआधी "अलवरी'चा अहवाल वाचला होता. बैठकीनंतर राजेंद्रसिंहांना भेटलो. अलवरी नदीबाबत किती दिवस ते तेच ते सांगणार आहात? नवीन काय करणार आहात? आम्ही पुढाकार घेतो, तुम्ही सहकार्य कराल का, असे विचारले. त्यांनी सहमती दर्शवली. तेथेच अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनाचा मानस व्यक्त केला. "अलवारी'तील अभ्यासक गोपालसिंग यांना त्यांनी अग्रणी पाहणीसाठी पाठवले. ऐनवाडी, जाधववाडी, गोरेवाडी, बलवडी, बेणापूर, सुलतानगादे असा नदीपात्रातून पायी फिरलो. नदीपात्र खूपच अरुंद होते. त्यात बंधारा बांधण्याची कल्पना पुढे आली. त्यासाठी बलवडीच्या गायकवाड मळ्यातील जागा निश्‍चित केली. लोकांना एकत्र केले. लोकसहभागातून नदीपात्रात बंधारा बांधण्याच्या संकल्पनेची प्रारंभी चेष्टा झाली. जलबिरादारीच्या सुनील जोशी यांनी बंधारा बांधण्यासाठी परवानगीसाठी आग्रह धरला. त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे अर्ज केला. मान्यता मिळाली. बंधारा भूमिपूजनास राजेंद्रसिंह राणांना बोलावलं. त्यांच्यासह जिल्हाधिकारी कुशवाह, आमदार मोहनराव कदम, प्रातांधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन गिरी आले. राजेंद्रसिंह यांनी पूजाअर्चा केली. कुशवाहांनी कुदळ मारली. अग्रणीच्या पुनरुज्जीवनास सुरवात झाली. लोकांना विश्‍वासात घेतले. थेट बंधाऱ्यातून पाणी उपसा करायचा नाही. बंधाऱ्या खालील लोकांचाही पाण्यावर हक्क आहे, हे समजावले. 

प्रश्न : अडचणींवर कशी मात केली? 

श्री. पवार : अडचणी खूप आल्या. बंधाऱ्याची पायाखोदाई झाल्यावर मोठा पाऊस पडला. परिसरात चिखल साचला. ठेकेदार काम करण्यास तयार होईना. ठेकेदार 
पसार झाला. अनेक ठेकेदारांना विनंत्या केल्या. शेवटी आटपाडीचा शिवाजी जाधव तयार झाले. कामाला गती आली. पैशाची कमतरता होतीच. लोकवर्गणी संपली. प्रसारमाध्यमातील बातम्या वाचून पुण्याच्या मगर पट्टयातील पंकज हेर्लेकर, निंबाळकर यांनी 150 पोती सिमेंट, दोन ट्रक खडी दिली. मोठी आर्थिक मदत केली. कामाने गती घेतली. साडे सहा लाख रुपयांत बंधारा तयार झाला. लोकांनी अग्रणीनदी पात्रात सहा बंधारे बांधले. 

प्रश्न : प्रशासनाचे सहकार्य मिळाले का? 

श्री. पवार : अग्रणी कामाची पाहणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी आले. कौतुक केले. इतके चांगले काम करताय तर आम्ही जिल्हा नियोजन समितीतून बंधाऱ्यांसाठी निधी देऊ, असे सांगितले. जलयुक्त अभियानांतर्गत राज्य सरकारने निधी दिला. नदीची खोलीकरण केले. यात लोकांचा सहभाग कमी होत गेला तो मात्र कायमचा. 

प्रश्न : दुष्काळी भागातील सिंचनाचे धोरण कसे असावे? 

श्री. पवार : लोकांना विश्‍वासात घेऊन धोरण ठरवावे. दुर्दैवाने तसे होत नाही. नव्या कायद्याने शेतीच्या पाण्याला दुय्यम स्थान दिले आहे. पाणी वापर सोसायटीमार्फत पाणी विकण्याचे धोरण हाती घेतलं आहे. पाणी वापर सोसायटी केल्यास पाणी हे ठरावीक लोकांची मक्तेदारी होण्याचा धोका संभवतो. तो टाळणं आवश्‍यक आहे. 

प्रश्न : पाणी योजना आणि वाद हे सूत्र झाले आहे, तुमच्या सूचना काय? 
श्री. पवार : जलयुक्त शिवार योजना वादात सापडली, हे खरे आहे. पायाच भक्कम नसले तर इमारत उभी राहणार कशी? जलयुक्त शिवार योजना फसली, असे तज्ज्ञ म्हणतात. जलसिंचनाबाबत लोकांत आत्मविश्वास, जागृती निर्माण करायला पाहिजे. त्यांना शाश्वत पाण्याची खात्री द्यायला हवी. 

प्रश्न : नदी किंवा जलस्रोत स्वच्छता पुनरुज्जीवन यात लोकसहभाग का टिकत नाही? 
श्री. पवार : लोकांना विश्वासात घेऊन आपण काम करतो काय, त्यांनी केलेल्या सूचना विचारात घेता? हे तपासले पाहिजे. तरच लोकसहभाग टिकेल. 

प्रश्न : शाश्वत पाण्याची खात्री दिल्यास फायदा होईल? 
श्री. पवार : शाश्वत पाणी दिले, तर लोकांचे जीवनमान उंचावले. त्याची खात्री द्यायला हवी. शेतीला नुसते पाणी देऊन उपयोग नाही. उत्पादित शेतमालाला हमी भाव हवा. तसा कायदा होणं अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफी नको, सुरक्षा कवच हवं आहे. तरच शेतकरी सक्षम होईल. त्याबाबतचा "बाप' हा पथदर्शी प्रकल्प आणि त्याचे निष्कर्ष समाजासमोर मांडू. 

कुशवाहांची कुदळ, गायकवाडांची गती 

अग्रणीनदी पुनरुज्जीवन कामाची पहिली कुदळ तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी मारली. यामध्ये गावेच्या गावे सहभागी झाली. व्यक्‍ती नाही तर संपूर्ण समूहाने ठरवले तर काय होते याचे उदाहरण म्हणजे अग्रणी ! कुशवाह यांच्या बदलीनंतरही शेखर गायकवाड हे जिल्हाधिकारी म्हणून आले. त्यांनी व टीमने झोकून देऊन काम केले. सध्या परतीच्या पावसाने अग्रणीनदी ओसंडून वाहत आहे. परिसरातील लोकांच्या विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. बळिराजा आनंदी आहे. 

संपादन : युवराज यादव