यंदाही पाऊस सामान्यच; सोलापुरातील सिद्धेश्‍वर यात्रेतील भाकणूक (Video)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सिद्धरामेश्‍वर यात्रेनिमित्त मानकरी देशमुख यांच्या घरातील गाईचे वासरु भगिनी समाजाजवळ आणण्यात आले. या वासराला दिवसभर पाणी, चारा न देता उपवास ठेवण्यात आले होते. होमप्रदीपन सोहळा झाल्यानंतर नंदीध्वजांच्या उपस्थितीत वासराची पूजा केली. यावेळी वासरासमोर धान्य, फळे ठेवली होती. वासरू ज्या वस्तूला स्पर्श करेल ती वस्तू महाग होईल असे भाकीत केले जाते. पण वासराने कोणत्याही वस्तूला स्पर्श केला नाही.

सोलापूर : सिद्धेश्‍वर महाराजांच्या यात्रेनिमित्त आज भाकणूक झाली. त्यामध्ये यंदाच्या वर्षीही पाऊस सामान्यच राहण्याची शक्‍यता वर्तविली. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची भाववाढ होणार नाही. मागील वर्षी ज्याप्रमाणे स्थिती होती, तशीच स्थिती यंदाच्या वर्षीही कायम राहिल असेही भाकणुकीमध्ये सांगितले. 
सिद्धरामेश्‍वर यात्रेनिमित्त मानकरी देशमुख यांच्या घरातील गाईचे वासरु भगिनी समाजाजवळ आणण्यात आले. या वासराला दिवसभर पाणी, चारा न देता उपवास ठेवण्यात आले होते. होमप्रदीपन सोहळा झाल्यानंतर नंदीध्वजांच्या उपस्थितीत वासराची पूजा केली. यावेळी वासरासमोर धान्य, फळे ठेवली होती. वासरू ज्या वस्तूला स्पर्श करेल ती वस्तू महाग होईल असे भाकीत केले जाते. पण वासराने कोणत्याही वस्तूला स्पर्श केला नाही. त्यामुळे गेल्या वर्षी सारखीच परिस्थिती यंदाही स्थिर राहील. अन्नधान्याच्या किमतीही जैसे थे राहतील. वासरु शांत उभे होते. त्यामुळे देशात शांतता राहील असेही भाकीत राजशेखर हिरेहब्बू यांनी केले. वासराने मलमूत्र विसर्जन न केल्यामुळे मागच्या वर्षीसारखाच पाऊस यंदाही राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
तत्पूर्वी, "एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, सिद्धेश्‍वर महाराज की जय'चा जयघोष, विद्युत दिव्यांनी लखलखलेले मानाचे सातही नंदीध्वज, पांढरेशुभ्र बाराबंदी पोशाख परिधान केलेले नंदीध्वजधारक आणि जमलेल्या हजारो भाविकांच्या साक्षीने आज रात्री होम मैदानावर कुंभारकन्येचा प्रतीकात्मक होमविधी सोहळा झाला. 
होमविधीसाठी नंदीध्वजांची मिरवणूक दुपारी साडेचारच्या सुमारास हिरेहब्बू वाड्यातून निघाली. प्रारंभी, मानकरी देशमुख, हिरेहब्बू यांच्या हस्ते नंदीध्वजांची विधिवत पूजा करण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती. यावेळी नंदीध्वज मार्गस्थ होताना सुवासिनी नंदीध्वजांची मनोभावे पूजा करत होत्या. ही मिरवणूक पसारे वाडा, फौजदार चावडी पोलिस स्टेशनजवळ आल्यानंतर मानाच्या पहिल्या नंदीध्वजास नागफणा बांधण्यात आल्या. त्याचबरोबर नंदीध्वजास विद्युत दिवे बांधून रोषणाई करण्यात आली. त्यानंतर हिरेहब्बू यांच्या हस्ते पूजा केली.

पूजेनंतर नागफणा पेलणाऱ्या व नंदीध्वज उचलून देणाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. त्यानंतर नंदीध्वज होम मैदानाकडे मार्गस्थ झाले. नंदीध्वज पावणेदहाच्या सुमारास होम मैदानावर आले. होम कट्ट्याजवळ दहाच्या सुमारास धार्मिक विधीला सुरवात झाली. बाजरीच्या पेंढीस प्रतीकात्मक कुंभारकन्या म्हणून सौभाग्यालंकार घालून त्या कुंभारकन्येस मणी, मंगळसूत्र, बांगड्या, जोडवे, हार-दांडा घालून सजविण्यात आले. विधिवत पूजा करून हिरेहब्बू यांच्याकडून रात्री साडेदहाच्या सुमारास होमास अग्नी देण्यात आला. त्यानंतर कुंभार यांना विड्याचा मान दिला गेला. नंतर होम कट्ट्यास नंदीध्वज प्रदक्षिणा घालून भगिनी समाजाजवळ आल्यानंतर देशमुखांच्या वासराची भाकणूक झाली. रात्री उशिरा नंदीध्वज मिरवणुकीने हिरेहब्बू वाड्यात दाखल झाले. फडीचा मानकरी व हिरेहब्बू यांना प्रसाद देऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Religious events of Siddheshwar Yatra in Solapur