"रेमडेसिविर'चा पुन्हा तुटवडा; ना खासगीत, ना सरकारी रुग्णालयात उफलब्ध

अजित झळके
Monday, 5 October 2020

कोरोना रुग्णांवर उपचारात महत्वाचे औषध ठरलेल्या रेमडेसिविर या इंजेक्‍शनचा जिल्ह्यात पुन्हा एकदा तुटवडा निर्माण झाला आहे. ही इंजेक्‍शन ना खासगी रुग्णालयात उपलब्ध होताहेत, ना सरकारी रुग्णालयाकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे.

सांगली : कोरोना रुग्णांवर उपचारात महत्वाचे औषध ठरलेल्या रेमडेसिविर या इंजेक्‍शनचा जिल्ह्यात पुन्हा एकदा तुटवडा निर्माण झाला आहे. ही इंजेक्‍शन ना खासगी रुग्णालयात उपलब्ध होताहेत, ना सरकारी रुग्णालयाकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. एक-दोन दिवसांत इंजेक्‍शन मिळतील, असा विश्‍वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. तोवर रुग्णांच्या नातेवाईकांची मात्र फरफट सुरु आहे. 

रेमडेसिविर औषधांची जिल्ह्यात, राज्यात मोठी मागणी आहे. रुग्णाच्या फुफुसात संसर्ग वाढू नये, यासाठी ही इंजेक्‍शन वापरली जातात. ती परिणामकारक ठरलेली आहेत. त्यामुळे साठ वर्षाहून अधिक वयाच्या रुग्णांसाठी ही औषधे मागवली जातात आणि ती मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ उडते, हे चित्र पुन्हा सुरु झाले आहे.

या इंजेक्‍शनचे दर गेल्या पंधरा दिवसांत कमी झाले आहेत. आता हे इंजेक्‍शन अडीच हजार ते 2800 रुपयांपर्यंत उपलब्ध होत आहे. औषध निर्मात्या कंपन्यांच्या स्पर्धेमुळे हे शक्‍य झाले आहे, मात्र त्या स्पर्धेतून स्वस्त इंजेक्‍शन खरेदीच्या प्रयत्नातच सध्या तुटवडा निर्माण झाल्याचे समोर आले आहे. या स्थितीत लवकर इंजेक्‍शन उपलब्ध करण्याची गरज आहे. अन्यथा, रुग्णांच्या नातेवाईकांची परीक्षा संपणार नाही. 

कोरोनाचे नोडल ऑफिसर डॉ. संजय साळुंखे म्हणाले, ""इंजेक्‍शन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच ती मिळतील. रुग्णांची सोय होईल.'' 

आमदारांची शिफारस मागितलीच कुणी? 

रेमडेसिविर इंजेक्‍शनसाठी आमदारांचे शिफारसपत्र आणा, अशी विचित्र मागणीचा प्रकार मिरज तालुक्‍यात काही रुग्णांबाबत घडला. त्यानंतर रुग्णांनी ती धडपड केली. त्याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे "सकाळ'ने चौकशी केली. अशा प्रकारचा नवा नियम लागू झाला आहे का? या प्रश्‍नावर जयंतरावांनी संताप व्यक्त करत "आमदारांची शिफारस मागितलीच कुणी?' असा सवाल केला. अशा शिफारशीची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Remedicivir" again in short supply; not available in private or government hospitals