"एकेरी वाहतूक हटवा, अन्‌ व्यवसाय वाचवा' ; व्यापाऱ्यांची निदर्शने 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 October 2019

कर्मवीर पथावरील "एकेरी वाहतूक हटवा आमचे व्यवसाय वाचवा' अशा आशयाचे फलक हातात घेऊन व्यापाऱ्यांनी मल्हार पेठेत निदर्शने केली.

सातारा ः पोलिस मुख्यालयापासून शनिवार चौकापर्यंत जाण्यासाठी केलेली एकेरी वाहतूक रद्द करा अन्यथा सोमवारी (ता. 21) होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा कर्मवीर पथावरील व्यापाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, आज व्यापाऱ्यांनी कर्मवीर पथावर "एकेरी वाहतूक हटवा, आमचे व्यवसाय वाचवा' अशा आशयाचे फलक हातात घेऊन निदर्शने केली.

 
पोलिसांनी पोलिस मुख्यालयापासून ते शनिवार चौकापर्यंत एकेरी वाहतूक लागू केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. गेले तीन महिने आम्ही जिल्हा प्रशासन, आरटीओ आणि पोलिस अधीक्षकांकडे आमचे गाऱ्हाणे मांडत आहोत. त्यानंतर बैठकाही झाल्या. या प्रश्‍नी समिती तयार करण्यात आली आणि त्यानंतर सर्व्हे झाला. प्रशासनाने तब्बल तीन महिने वेळकाढूपणा केला.

एकेरी वाहतुकीमुळे आमच्याकडे ग्राहक वर्ग येत नाही. परिणामी आर्थिक मंदीमुळे व्यापारही खालवला आहे मात्र, येथील गाळेधारकांना तीस- तीस हजार रुपये भाडे द्यावे लागत आहे. एकूणच आमचा व्यवसाय अडचणीत आलेला आहे. अशी पार्श्‍वभूमी असताना आमच्या मागण्यांचा विचार होत नसल्याने सोमवारी (ता. 21) होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानावर आम्ही बहिष्कार घालणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: " Remove one-way traffic, save our business '; merchants' demonstrations in satara