महाकाय वृक्षांच्या पुर्नरोपणाबाबत अनास्थाच; शेकडो वर्षांच्या निसर्गसंपदेवर कुऱ्हाड ​

अजित कुलकर्णी
Monday, 7 September 2020

दैनिक सकाळ'ने प्रथम वाचा फोडल्यानंतर पर्यावरणप्रेमींचे आंदोलन उभे राहिले.

सांगली : मिरजेहून पंढरपूरला जाणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग होतोय, मात्र निसर्गसंपदा नष्ट झाल्याने हमरस्ता होउनही रयाच गेल्याची परिस्थिती आहे.

डेरेदार झाडांच्या आकर्षक कमानी, उन्हाळ्यात मिळणारा थंडावा, उर्जा देणारा प्राणवायू या सगळ्या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. हा निसर्गठेवा टिकवता आलाही असता, मात्र प्रशासकीय अनास्था व विकासाच्या नावाखाली होणाऱ्या कत्तलीमुळे महामार्ग उजाड बनत आहे.

अनेक ठिकाणी झाडांच्या पुर्नरोपणाचा यशस्वी झालेला प्रयोग रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रशासकीय अनास्थेपोटी होउ शकला नाही, याचे शल्य कायम बोचत राहणार आहे. 

मिरज-पंढरपूर राज्य मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग बनत असताना निसर्गसंपदेची झालेली हानी अपरिमित आहे. कारण शेकडो वर्षांपासूनची झाडे सपासप कापली जात आहेत. तानंग फाटा ते नागज फाटादरम्यान अनेक महाकाय वृक्ष जमीनदोस्त होत आहेत.

सुमारे 900 लहान मोठ्या वृक्षांचा बळी गेला आहे. ही जुनी-पुराणी निसर्गसंपदा ऐतिहासिक ठेवा म्हणून जपायला पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घ्यायला हवा होता. मात्र शासनाचे काम, त्याला कोण अडवणार? अशीच मानसिकता आहे.

भोसे (ता. मिरज) येथील यल्लम्मा मंदिरानजीकचा महाकाय वटवृक्ष वाचवण्यासाठी "दैनिक सकाळ'ने प्रथम वाचा फोडल्यानंतर पर्यावरणप्रेमींचे आंदोलन उभे राहिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका आदेशाने हा वटवृक्ष सुदैवाने वाचला. मात्र अशा शेकडो वृक्षांवर जमीनदोस्त होण्याची वेळ आली. त्यांचा टाहो ना ठेकेदार कंपनीने ऐकला...ना पर्यावरणप्रेमींना ऐकू आला...त्यासाठी जाब विचारावा असे निगरगट्ट प्रशासनालाही वाटले नाही, हे दुर्दैव. 

 

वृक्ष प्रत्यारोपणाचा गुजर पॅटर्न... 
जगप्रसिध्द शिल्पकार विजय गुजर यांनी कळंबी (ता. मिरज) येथील फार्म हाउसवर एक प्रयोग केला. राष्ट्रीय महामार्गात त्यांच्या दीड एकरातील 80 झाडे नष्ट झाली असती. आंबा, नारळ, साग या झाडांचे शेजारील दोन एकरात क्रेन, जेसीबीच्या मदतीने पुर्नरोपण केले. विशेष म्हणजे ती तयार झाडे पुर्नरोपणानंतर पुन्हा फळे देताहेत. मोठा खड्डा, त्यात पाणी सोडून मुळे एकरुप होण्यासाठी लागवडीनंतर खतासह ह्युमिक ऍसिडचा वेळोवेळी वापर केल्यानंतर पुर्नरोपण यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: replanting giant trees; The ax on hundreds of years of natural resources