थापा मारू नकोस, पोलिस ठाण्यात हजर हो; कामटेला बजावल्याची डॉ. काळे यांची साक्ष

शैलेश पेटकर
Tuesday, 23 February 2021

बहुचर्चित अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर सुरू आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित होते.

सांगली ः चोरीच्या संशयावरून शहर पोलिसांनी पकडलेल्या अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे हे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्यानंतर युवराज कामटेला फोन करून आरोपी कसे पळून गेले?, थापा मारू नकोस?, ताबडतोब पोलिस ठाण्यात हजर हो असे बजावल्याची महत्त्वपूर्ण साक्ष तत्कालीन पोलिस उपधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी न्यायालयासमोर दिली. 

बहुचर्चित अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर सुरू आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित होते. या खटल्याची उद्यापासून दोन दिवस सलग सुनावणी होणार आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरतपास घेतला. बचावपक्षातर्फे ऍड. किरण शिरगुप्पे आणि ऍड. विकास पाटील-शिरगावकर यांनी उलटतपास घेतला.

यावेळी सरकार पक्ष आणि बचाव पक्ष यांच्यात जोरदार युक्तिवादही झाला. 
डॉ. काळे यांनी 6 नोव्हेंबर 2017 रोजीचा घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला. त्यांनी न्यायालयासमोर सांगितले की, शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्या दिवशी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास मी शहर पोलिस ठाण्यास भेट दिली. त्यावेळी कोथळे आणि भंडारे यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतर कामटेला त्यांचे रेकॉर्ड तपासण्यास सांगून निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. 

त्यादिवशी नाईट राउंड होता. रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी शहर पोलिस ठाण्यास भेट दिली. त्यावेळी कोठडीत संशयित कोथळे आणि भंडारे नसल्याचे दिसले. कामटेही तेथे नव्हता. त्यांनी याबाबत कामटेला फोनवरून विचारणा केली. त्यावेळी कामटेने दोन आरोपी पळून गेल्याचे सांगितले. याबाबत वरिष्ठांना का बोलला नाही? नाकाबंदी का केली नाही, अशी विचारणा करून, थापा मारू नकोस?, आरोपींना घेऊन ताबडतोब पोलिस ठाण्यात ये असे बजावले. 

दरम्यान, शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक समीर चव्हाण यांना ठाण्यात येण्यास सांगितले. नाईट राउंडला असलेले सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक रवींद्र डोंगरे हे शहर पोलिस स्टेशनला आले. उपनिरीक्षक चव्हाण तेथे आल्यानंतर त्यांच्याकडे आरोपी कसे पळून गेले? याबाबत चौकशी केली. ते म्हणाले,""याबाबत मला माहिती नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासले. ते बंद असल्याचे निदर्शनास आहे.''

दरम्यान रात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास आयर्विन पुलाजवळ आले होते. त्यावेळी पुलाखाली दोन व्यक्ती थांबल्याचे त्यांना लक्षात आले. त्यावेळी दुचाकीवरून कामटे आला. आरोपींचा शोध घेत असल्याचे सांगितले. पुलाखाली थांबलेले दोघे खबऱ्या असून त्यांच्या मदतीने आरोपींना शोधत असल्याचे त्याने सांगितले. ही माहिती वरिष्ठांना का कळवली नाही? नाकाबंदी का केली नाही?, गुन्हा का दाखल केला नाही? अशी विचारणा केल्यानंतर कामटेने मी निलंबित होईन म्हणून गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगितले. पळून गेलेल्या आरोपींना मी शोधून आणतोच असेही त्याने सांगितले. आता पोलिस स्टेशनला जा व याबाबत गुन्हा दाखल करा, अशा सूचना दिली. 

*एफआयआरवर दुसऱ्या दिवशी स्वाक्षरी 
रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास कामटे शहर पोलिस स्टेशनला आला. त्याने आरोपी पळून गेल्याबाबत एफआयआर केली. व आरोपींच्या शोधासाठी कामटे निघून गेला. दरम्यान पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास उपनिरीक्षक चव्हाण यांचा फोन डॉ. काळे यांना आला. त्यांनी काळे यांना सांगितले की कामटेने एफआयआर केली आहे. मात्र, त्यावर स्वाक्षरी केली नाही. दरम्यान काळे यांनी तुम्ही गुन्हा दाखल करून घेण्याबाबत सांगितले.

दुसऱ्या दिवशी काळे यांना कामटेचा फोन आला. त्याने एक आरोपी निपाणी येथे मिळाला असून त्याला सांगलीला घेवून येत असल्याचे सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अमोल भंडारेला घेवून कामटे सांगलीत आल्याचे काळे यांनी न्यायालयासमोर सांगितले. त्यानंतर दाखल केलेल्या एफआयआरवर कामटेने दुसऱ्या दिवशी सही केल्याचे काळे यांनी सांगितले. 

बचाव पक्षाचे ऍड. शिरगुप्पे यांनी उलटतपास घेतला. त्यावेळी हलचाल पुस्तकापासून अनेक मुद्दे न्यायालयासमोर मांडले. ऍड. शिरगावकर-पाटील यांनी उलटतपासात आरोपी पळून गेल्याचा गुन्हा दाखल होता. गुन्ह्याच्या नोदवलेल्या तपास टिपणात तारखेचा उल्लेख नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. याशिवाय मोबाईल नंबर वाचून मुद्द्यावर अक्षेप घेतला. यावेळी ऍड. निकम आणि शिरगावकर-पाटील यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. सहायक सरकारी वकील प्रमोद भोकरे आणि सीआयडीचे उपाधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी सरकार पक्षाला मदत केली. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: report to the police station- asked to Kamte; told dr. Kale in court