स्थायी समितीत सभात्याग ; रंगले नाराजीनाट्य 

अजित झळके 
Wednesday, 20 January 2021

शिराळा तालुक्‍यातील डोंगरी भागाला मंजूर केलेला 26 लाख रुपयांचा निधी रद्द करून तो कृषी आणि पशुसंवर्धन विभागाकडे वर्ग करण्याची मागणी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी केल्याने नाराज बांधकाम सभापती जगन्नाथ माळी यांनी आज स्थायी समितीत सभात्याग केला. सभापतींनीच सभात्याग करण्याची घटना घडल्याने भाजप अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. 

सांगली : शिराळा तालुक्‍यातील डोंगरी भागाला मंजूर केलेला 26 लाख रुपयांचा निधी रद्द करून तो कृषी आणि पशुसंवर्धन विभागाकडे वर्ग करण्याची मागणी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी केल्याने नाराज बांधकाम सभापती जगन्नाथ माळी यांनी आज स्थायी समितीत सभात्याग केला. सभापतींनीच सभात्याग करण्याची घटना घडल्याने भाजप अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, सभापती जगन्नाथ माळी, आशा पाटील, सुनिता पवार, प्रमोद शेंडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बांधकाम सभापती माळी यांनी शिराळा तालुक्‍यातील डोंगरी भागाच्या विकासासाठी 26 लाखांचा अतिरिक्त निधी मंजूर करून घेतला. 

बहुतांश सभापती अशा पद्धतीने गट, भागात अधिकचा निधी नेतात. यावेळी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी आक्षेप नोंदवत ते सभापती असलेल्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागाला निधी द्या, अशी मागणी केली. त्यातून ट्रॅक्‍टर खरेदी करून शेतकऱ्यांना देता येतील, असा विषय मांडला. माळी नाराज झाले. आम्ही कधी नव्हे ते डोंगरी भागासाठी निधी नेतोय, इतर कामांसाठी बांधकाममधून मोठा निधी दिला असताना या पैशांवरही डोळा का? असा सवाल त्यांनी केला. त्यातून नाराजीनाट्य घडले. श्री. माळी यांनी सभात्याग केला. 

अखर्चित रक्कम वेळेत खर्च व्हावी, ती परत जावू नये, अशा सूचना देण्यात आल्या. सहा लाख अखर्चित रक्कम शाळा, अंगणवाड्यांच्या नळ कनेक्‍शनसाठी वापराबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला सूचना देण्यात आल्या. शिक्षण, समाजकल्याण विभागाकडून निधी परत जाण्याची शक्‍यता आहे. दोन्ही विभागानी निधी विहित मुदतीत खर्च करण्याची सूचना केली. जिल्हा परिषद सदस्यांच्या गटात इतर जिल्हा मार्ग नसतील तर त्या सदस्यांचे गटात ग्रामीण मार्गासाठी सदस्यांचा निधी खर्च करण्याबाबत परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची सूचना करण्यात आली. 

जि. प. आवारात शिवाजी महाराजांचा पुतळा... 
जिल्हा परिषदेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचे काम दोन टप्प्यात करण्याचे ठरले. राज्य शासनाची मान्यता घेण्याची प्रक्रिया गतीने करावी, अशी सूचना करण्यात आली.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resignation of the Standing Committee; Rangale Narajinatya