गायरानात ठराव क्रीडांगणाचा, मात्र उभारली घरे, माजी सैनिकाचा एल्गार

गोरख चव्हाण
Friday, 11 September 2020

खरशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथे क्रीडांगणासाठी तरुण कार्यकर्त्यांसह माजी सैनिकाने एल्गार पुकारला आहे.

कवठेमहांकाळ : खरशिंग (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथे क्रीडांगणासाठी तरुण कार्यकर्त्यांसह माजी सैनिकाने एल्गार पुकारला आहे. 20 वर्षांपासून क्रीडांगणाचा प्रश्‍न भिजत पडला असून खेळाडूंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत जागा देण्याची मागणी केली आहे.

गायरान हद्दीतील गट नंबर 7 मधील 5 हेक्‍टर जागा ग्रामपंचायतीने ठराव घेउन दिली. मात्र क्रीडांगणाऐवजी येथे घरे उभारल्याने नाराजी व्यक्‍त होत आहे. दरम्यान, क्रीडांगण उभारणीसाठी माजी सैनिक सूर्यकांत पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

वीस वर्षांपूर्वी गट नंबर 7 मधील 5 हेक्‍टर गायरानातील जमीन क्रीडांगणासाठी देण्यास ग्रामपंचायतीने ठराव केला होता. मात्र तो कागदावरच राहिला. ठरावाबाबत पुन्हा कोणताही पाठपुरावा न झाल्याने क्रीडांगण उभारणीचे काम अधांतरीच राहिले. दरम्यान मोकळ्या गायरानात काही ग्रामस्थांनी कब्जा करत विनापरवाना घर, इमारती, गोठे उभारण्यास सुरुवात केली. त्याला ग्रामपंचायतीने अटकाव न केल्याने अतिक्रमणे वाढतच गेल्याचा आरोप माजी सैनिक सूर्यकांत पाटील यांनी केला.

या विषयावर आवाज उठताच गायरान जमिनीवर वाढत चाललेल्या अतिक्रमणावर मासिक सभेत चर्चा झाली. क्रीडांगणासाठी जमीन मिळण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केल्यावर त्याची तातडीने दखल घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी कवठेमहांकाळच्या तहसीलदारांना याबाबत अभिप्राय मागवला आहे. 

क्रीडांगणासाठी प्रसंगी आंदोलन 
सुमारे 20 वर्षांपूर्वी एका मंडळाने क्रीडांगणाच्या जागेसाठी ग्रामपंचायतीने ठराव केला. मात्र उदासिनतेमुळे ते काम होउ शकले नाही. आता पुन्हा नव्याने सगळा प्रस्ताव प्रशासनाकडे देण्याची तयारी सुरु आहे. गायरान जमिनीतील अतिक्रमणे हटवण्याबाबत कडक कारवाई गरजेची आहे. तरुणांसह ग्रामस्थांचाही या मागणीला भरघोस पाठिंबा मिळत आहे. नजीकच्या काळात क्रीडांगणाबाबत लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन उभारण्याचीही तयारी आहे. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resolution for stadium, but erected houses: ex-soldier fighting for the cause