लोकप्रतिनिधींचा सन्मान राखा, विश्‍वासात घ्या; नगरविकासमंत्र्यांनी आयुक्‍तांना फटकारले

बलराज पवार
Sunday, 10 January 2021

प्रशासनाने लोकप्रतिनिधींचा सन्मान राखून त्यांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे, असा सक्त सूचनावजा इशारा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आयुक्त नितीन कापडणीस यांना दिला.

सांगली : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी विकास रथाची दोन चाके आहेत. प्रशासनाने लोकप्रतिनिधींचा सन्मान राखून त्यांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे, असा सक्त सूचनावजा इशारा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आयुक्त नितीन कापडणीस यांना दिला. आयुक्त कापडणीस यांच्याविरोधात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी नगरविकासमंत्र्यांसमोर तक्रारींच्या निवेदनांचा पाऊस पाडला. खासदार संजय पाटील यांनी थेट नाराजी व्यक्त केली. अडचण असेल तर आम्हाला बोलवा, आम्ही समझोता करू, असेही खासदार पाटील म्हणाले. 

मंत्री शिंदे यांची प्रशासकीय बैठक असल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांना केवळ स्वागतासाठी बोलावले होते. बैठकीला नगरसेवकांना निमंत्रणच नव्हते. महापौर वगळता कोणाला प्रवेश नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. त्याचे तीव्र पडसाद आज शिंदे यांच्यासमोर उमटले. महापौर गीता सुतार, कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण, अभिजित भोसले, महिला व बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे-पाटील, नगरसेवक फिरोज पठाण, योगेंद्र थोरात, नगरसेविका वहिदा नायकवडी, शुभांगी साळुंखे, आरती वळवडे, प्रभाग समिती तीनच्या सभापती मदिना बारुदवाले, स्वाती पारधी आदींनी श्री. शिंदे यांना पालिका दरवाजात अडवून स्वागत केले. याचवेळी काही नगरसेवकांनी आयुक्तांसह प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचला आणि स्वतंत्र वेळ देण्याची मागणी केली.

श्री. शिंदे यांनी या सर्वांना बैठकीतच येण्याची सूचना केली. बैठकीत सर्वांनी प्रशासनाविरोधातील पुराव्यांसह हरकती, तक्रारींचा पाऊसच पाडला. 
विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर म्हणाले, ""महापालिकेचे 700 कोटी रुपये अंदाजपत्रक आहे. मात्र, सदस्यांनी सुचवलेली 25-30 हजार रुपयांची कामेही आयुक्त अडवितात. याउलट महासभा आणि स्थायी समितीच्या मान्यतेशिवाय प्रशासन नको तेथे कोट्यवधींची उधळपट्टी मात्र करते. प्रशासनाच्या बाजूने असलेल्यांची कामे मंजूर होतात. मात्र, गैरकारभाराला विरोध करणाऱ्यांचे प्रस्ताव जाणीवपूर्वक अडविले जातात, ही मनमानी रोखावी. लोकांच्या अधिकारांची पायमल्ली केली जात आहे.'' 

कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वहिदा नायकवडी, शुभांगी साळुंखे, आरती वळवडे यांनीही प्रशासन मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार केली. महिला व बालकल्याण विभागाचा निधी प्रशासनाने परस्पर अन्य कामांकडे वळविला. महिला सदस्यांना सन्मानजनक वागणूक दिली जात नाही. तक्रारी करूनही दखल घेत नाहीत, अशी भूमिका मांडली. 
प्रशासन आणि आयुक्तांच्या कारभाराबद्दलच्या लेखी तक्रारींची आणि नाराजीची दखल घेत नगरविकासमंत्री श्री. यांनी शिंदे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय नसेल तर महापालिकेचा विकासरथ भरकटतो. लोकांनी निवडून दिलेल्या सदस्यांना आयुक्तांनी विकासकामे करताना विश्वासात घ्यावे. 

जयंतरावांचा भाजपला टोला 
भाजपने महापालिकेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल अप्रत्यक्ष पालकमंत्री जयंत पाटील यांनी टोला हाणला. ते म्हणाले, ""गेल्या सहा वर्षांत महापालिकेत येऊन नगरविकासमंत्र्यांनी समस्या ऐकून त्या सोडविण्याचे चित्र पहिल्यांदाच घडते आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी स्वत: महापालिकेत येऊन आपल्याला प्रश्न विचारले आणि त्यांची उकल त्यांनी केलेली आहे.'' 

"सकाळ'सह विविध निवेदनांची दखल... 
महापालिकेतील अनागोंदी कारभाराकडे "सकाळ'ने आज लक्ष वेधले होते. नगरविकासमंत्र्यांनी या प्रश्‍नाकडे लक्ष द्यावे, असे पत्रच लिहिले होते. विविध सामाजिक कार्यकर्ते, संघटना, लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. निवेदनांचा पाऊस पाडला होता. या सर्वांची दखल मंत्र्यांनी घेतल्याचे दिसून आले.

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Respect the people's representatives, believe in them; Urban Development Minister slapped the Commissioner