
प्रश्न : सध्याच्या संकटकाळात तातडीच्या कोणत्या उपाययोजना सांगाल?
डॉ. मडके ः शासन-प्रशासन युद्धपातळीवर काम करतेय. त्या प्रयत्नांना पूरक ठरेल अशा काही गोष्टी मी सांगेन. शासनाने सध्या आरोग्य सेतू नावाचे ऍप डेव्हलप केले आहे. ते लोकांसाठी आहे आणि कोरोनाबद्दलच्या शंका निरसन करण्यासाठी आहे. असेच अधिक शास्त्रशुद्ध ऍप सर्व प्रकारच्या डॉक्टरांसाठी तयार करावे. ज्याद्वारे तळागाळात काम करणाऱ्या डॉक्टरलाही समोर येणाऱ्या संशयित रुग्णांची माहिती थेट शासनापर्यंत पोहोचवता येईल. त्यातून शासन यंत्रणेला संशयितांपर्यंत कमी अवधीत थेट पोहोचता येईल.
प्रश्न ः सध्याच्या कायदेशीर-नियमांत कोणते बदल आणावे लागतील?
डॉ. मडके ः प्रवास तसेच लक्षणांबद्दलची माहिती लपवून ठेवणे हा सामाजिक गुन्हा आहे त्यादृष्टीने तातडीने काही कायदे करून ते समाजापर्यंत पोहोचवले पाहिजेत. मास्कचा वापर, शारीरिक अंतर ठेवून समाजात वावरण्याबातचे नियम ठरावीक काळासाठी कायदेशीर सक्तीचे केले पाहिजेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेला कारवाईसाठी बळ मिळेल. शासकीय बैठका, हॉस्पिटल्समधील मांडणी याबाबतही असे नियम तातडीने करून त्याची अंमलबजावणी यापुढे करावी लागेल. शासकीय बैठकांच्या खोलीमधील वायुविजनाची व्यवस्थेकडे लक्ष दिले पाहिजे. एसींचा वापर बंद केला पाहिजे. आघाडीवर राहून काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, शासकीय कर्मचारी, पोलिस यांच्यासाठी सर्वंकष नियमावली तयार करून त्याच्या अंमलबजावणीची सक्ती केली पाहिजे.
प्रश्न ः यापुढे कोरोना चाचण्यांबाबत तसेच डॉक्टरांसाठीच्या सुरक्षा साधनांबाबतची स्थिती कशी असेल ?
डॉ. मडके ः पुढील महिनाभरात परवडणाऱ्या दरात कोरोना निदान चाचण्यांची सोय होईल. शासनाने त्या मोफत उपलब्ध करून द्याव्यात असे सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिले आहेत. या चाचण्या मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय या रोगाच्या प्रसाराबाबत नेमके अंदाज बांधता येणार नाहीत. भारतातील नेमके चित्र येत्या आठवडाभरात स्पष्ट होईल आणि त्यानंतरच कोरोनाविरोधातील लढाईचे दीर्घकालीन स्वरुपही स्पष्ट होईल. डॉक्टरांसाठी पीपीई किटचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. मात्र अशी किट अतिदक्षता विभागात वावरणाऱ्यांसाठीच गरजेची आहेत. ती सर्वांनाच मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक नाही आणि खर्चिकही असेल. एरवीच्या रुग्ण तपासणीसाठी साधे मास्क आणि रुग्णापासूनचे सामासिक अंतर पुरेसे आहे. कोरोना बाधित व्यक्ती बोलताना हवेत उडणारे तुषारही घातक ठरू शकतात असे जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे त्यामुळे आपल्याला या रोगावर लस उपलब्ध होईपर्यंत कोणत्या पातळीवर दक्षता घ्यायची आहे याचा अंदाज यावा.
प्रश्न ः बरे झालेल्या रुग्णांबाबत तसेच रुग्णांची माहिती देण्याबाबतचे धोरण हवे?
डॉ. मडके ः बरे झालेल्या रुग्णांनी पुढील महिनाभर स्वतःला घरातच कोंडून घेणे योग्य ठरेल. कारण तो बरा झाला तरी या रुग्णांपासून पुन्हा रोग प्रसाराचा धोका कायमच असतो. याबद्दलचे नेमके निष्कर्ष खात्रीने पुढे येत नाहीत तोपर्यंत ही दक्षता घ्यावीच लागेल. या रुग्णांची बाधित कालावधीचा प्रवासाची माहिती नावासह जाहीर करणे सध्याच्या काळात योग्यच ठरेल असे मला वाटते. सामाजिक बहिष्काराच्या भीतीपोटी प्रशासन सध्या ही माहिती जाहीर करीत नाही. मात्र लोकांकडून दक्षता घेतली जावी यासाठी थोडा धोका पत्करून ही माहिती जाहीर करणेच योग्य ठरेल. त्यामुळे बाधित पूर्णपणे घरातच राहील याची काळजी समाजाकडूनही घेतली जाईल. अर्थात हा कालावधी तात्पुरता असेल आणि भविष्यात रुग्ण पूर्ण बरा झाल्यानंतर त्याच्याबाबत अस्पृश्यता बाळगण्यासारखे काहीही नाही हे समाजाला यथावकाश पटवूनही देता येईल.
प्रश्न ः लॉकडाऊन उठवल्यानंतरची परिस्थिती कशी असेल?
डॉ. मडके ः यापुढे प्रत्येक रुग्णाचे ताप असलेला आणि ताप नसलेला असे दोन वर्ग करावे लागतील. किमान पुढचे वर्षभर ही स्थिती राहील. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात हा धोका वाढलेलाच असेल. त्यामुळे या रोगाविरोधात आपली लढत दीर्घकाळाची असेल हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यादृष्टीने हॉस्पिटल स्टाफ यासाठी प्रशिक्षित करावा लागेल. आपल्याकडे आधीपासूनच संसर्गजन्य आजारांचे प्रमाण मोठे आहे. टीबीसारख्या रोगामुळे दर चौथ्या मिनिटाला एक भारतीय माणूस मृत्युमुखी पडतो. त्यामुळे टीबी, मलेरिया, जुनाट दमा अशा संसर्गजन्य व श्वसन रोगींबाबत या विषाणूचे परिणाम काय होतील याचे नेमके चित्र स्पष्ट नाही. प्रगत युरोपियन देशांनी टीबीसारख्या रोगाला हद्दपार केले आहे. आपल्याकडे कोरोनामुळे आलेली जागृती कायम राहिली तर आपल्याकडील संसर्गजन्य रोगांचे प्रमाणही कमी होऊ शकेल. अर्थात भारतीयांनी या संधीचा फायदा घेतला तरच. कोरोना विषाणूचा भारतीयांना नेमका कितपत संसर्ग होईल याबद्दलही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. मात्र त्याबद्दल आत्ताच बोलणे योग्य ठरणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.