लॉकडाऊन काळातही मध्य रेल्वे माला'माल'; 165 दिवसांत नेला 22.28 दशलक्ष टन माल

शंकर भोसले
Tuesday, 8 September 2020

कोरोना संसर्गजन्य साथीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत मध्य रेल्वेच्या पुणे, सोलापूर, नागपूर, मुंबई, भुसावळ या पाचही विभागाकडून 23 मार्च ते 3 सप्टेंबर पर्यंत 165 दिवसांत 22.28 दशलक्ष टन मालवाहतूक करण्यात आली.

मिरज : कोरोना संसर्गजन्य साथीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत मध्य रेल्वेच्या पुणे, सोलापूर, नागपूर, मुंबई, भुसावळ या पाचही विभागाकडून 23 मार्च ते 3 सप्टेंबर पर्यंत 165 दिवसांत 22.28 दशलक्ष टन मालवाहतूक करण्यात आली. सध्या राज्यात रेल्वेची प्रवासी वाहतुक बंद असली, तरी माल वाहतूक मात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रेल्वे मालवाहतुकीच्या जलद सेवामुळे उद्योजकांचा प्रतिसाद चांगला आहे. रेल्वेने उर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी वेळेवरील मालवाहतुकीमुळे लॉकडाऊन व अनलॉक असूनही आपल्या मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या आहेत. उद्योगांना वेळेत माल पोहचविण्यासाठी मध्य रेल्वे कसोशीने प्रयत्न करीत आहे. 

मध्य रेल्वेने 23 मार्च ते 3 सप्टेंबर या 165 दिवसांत कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम पदार्थ, खते, कंटेनर, लोखंड व स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर वस्तूंची 8,899 मालगाड्यांच्या माध्यमातून 4,24,931 वॅगन्समधून मालवाहतूक केली. या कालावधीत दररोज सरासरी दोन हजार पाचशे वॅगन्सची मालवाहतूक भरणा केला गेली. मध्य रेल्वेने अखंडित वीजपुरवठा सुनिश्‍चित करण्यासाठी विविध वीज प्रकल्पांना एक लाख साठ हजार वॅगन कोळसा लोड केले आहेत.

शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन हजार सहाशे अन्नधान्याचे वॅगन्स, 2 हजार दोनशे साखरेचे वॅगन्स, 19 हजार नऊशे खतांचे वॅगन्स आणि 6 हजार दोनशे कांद्यांचे वॅगन्सची वाहतुक करण्यात आली. तसेच पेट्रोलियम पदार्थांचे 42 हजार वॅगन्स, लोह आणि स्टीलच्या 11 तिनशे वॅगन्स, सिमेंटच्या 27 हजार तिनशे वॅगन्स, कंटेनरच्या 1 लाख 32 हजार शंभर वॅगन्स आणि डी-ऑईल केक आणि इतर वस्तूंच्या सुमारे 21 हजार दोनशे वॅगन्स देखील लोड करण्यात आल्या. अखंड वीज निर्मितीसाठी लागणारा कोळशाचा पुरवठा करण्यासाठी 1 लाख साठ हजारांपेक्षा जास्त वॅगन कोळशाचे वॅगन्स पाठवण्यात आले.

मालवाहतुकीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी रेल्वे कर्मचारी चोवीस तास विविध गुड्‌स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयात काम करीत आहेत. लोको पायलट, गार्ड कुशलतेने गाड्या चालवत आहेत. ट्रॅक, सिग्नलिंग, ओव्हरहेड उपकरणे, लोकोमोटिव्ह्ज, डब्बे आणि वॅगन्सची देखभाल दुरूस्ती करणारे कर्मचारी चांगल्या सुविधा देत आहेत.

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Response to railway goods transport service even during lockdown