
सांगलीत खोक्यांचे प्रचंड अतिक्रमण होत आहे, अशावेळी त्याला अटकाव करायला जबाबदार यंत्रणा तयार नाही.
सांगली ः शहराचे वाटोळे होत असताना एकमेकाकडे बोट दाखवून रिकामे होण्याचा जुना कार्यक्रम कायम आहे. खोक्यांचे प्रचंड अतिक्रमण होत आहे, पुन्हा एकदा हे खोक्यांचे शहर होत आहे, अशावेळी त्याला अटकाव करायला जबाबदार यंत्रणा तयार नाही. खोक्यांच्या अतिक्रणाचा हिशेब ठेवण्याची, त्यावर कारवाईसाठी पुढे जाण्याची मुख्य जबाबदारी मनपाच्या चार सहायक आयुक्तांची आहे. त्यानंतर मालमत्ता विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे काम सुरू होते, मात्र इथे तीनही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवून रिकाम्या होत आहेत.
महापालिका क्षेत्रात सांगलीत 3 हजार तर मिरजेत सुमारे 800 खोकी अधिकृत आहेत. त्यात महापालिकेने बांधून दिलेल्या गणेश मार्केटसह काही गाळ्यातील खोक्यांचा समावेश आहे. शहरात प्रत्यक्ष खोक्यांची संख्या याच्या किमान दुप्पट आहे. उदाहरण द्यायचे तर वसंतदादा शासकीय रुग्णालयाजवळील सगळी खोकी अनधिकृत आहेत. त्यातील खोक्यांचे क्रमांकही बोगस आहेत, त्यांनी करही भरलेला नाही. ही खोकी दहा ते पंधरा हजार रुपये महिने या दराने भाड्याने देण्यात आली आहेत. त्याचे भाडे घेणाऱ्यांत बरेच महापालिकेचे कारभारी आहेत. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नांचा हा भाग होत नाही. त्यापेक्षा भूखंडांचा बाजार करण्यावरच महापालिकेचा जोर आहे आणि त्यातच अधिकारी, कारभारी रममान आहेत. परिणामी, गणपती मंदिरापासून ते विश्रामबाग चौकापर्यंत सगळीकडे खोकीच खोकी झाली आहेत.
सन 2008 मध्ये साडेतीन हजार खोकी काढण्यात आली होती. त्यातील दीड हजाराहून अधिक खोक्यांचे पुनर्वसन झाल्याचे मालमत्ता विभागातून सांगण्यात आले. अन्य खोक्यांचा प्रश्न अजून बाकी आहे. म्हणजे, सध्याच्या खोक्यांमध्ये आणखी दोन हजार खोक्यांची भर पडणार आहे. ही खोकी रोखायची असतील तर आता नागरिकांनीच पुढे आले पाहिजे. नागरिकांनीच शहर खोकेमुक्तची जबाबदारी शिरावर घेतली पाहिजे.
आदेश मिळाले की खोकी तोडून टाकतो
अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख दिलीप घोरपडे म्हणाले,""मला आदेश मिळाले की मी खोकी तोडून टाकतो. शिल्लक पण ठेवत नाही, मात्र आदेश आले पाहिजेत. कारण, अतिक्रमणातील, विनानंबरचे खोके असले तरी ते नोटीसशिवाय काढता येत नाही. ही नोटीस काढायचे अधिकारी ज्यांना आहेत, त्यांनी ती काढली पाहिजे. मिरजेत आम्ही खोकी फोडली होती, इथेही फोडून टाकू. कुणाचे लाड करायचे कारण नाही.''
नागरिकांनीच आता विरोधात मैदानात यावे
"सांगली माझी चांगली' हा फलक कर्मवीर चौकात लावून महापालिकेची जबाबदारी संपत नाही. भिंतीवर "स्वच्छ सांगली...'चा नारा देऊन शहर विकायचा कार्यक्रम हाती घेणे, हे सांगलीकरांपासून लपून राहिलेले नाही. आता हे खोक्यांचे शहर होण्यापासून वाचवण्यासाठी नागरिकांनीच मैदानात यावे. राजवाडा चौकातील नागरिकांनी हे करून दाखवले आहे. तेच सर्वत्र झाले पाहिजे. कुणी रातोरात खोके आणून बसवत असेल तर त्याला हाकलून काढा. तो ऐकत नसेल तर गांधीगिरी मार्गाने त्याला अटकाव करा. सोबतच्या चौकटीत या अतिक्रमणांना जबाबदार अधिकाऱ्यांची नावे दिली आहेत, त्यांना भेटा, तक्रारी द्या.
हे आहेत जबाबदार
संपादन : यवराज यादव