Video : अन् जवानांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

जवानांचे गावांत आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्‍यांच्या आतषबाजीत त्यांचे भव्यदिव्य मिरवणुकीद्वारे स्वागत केले. जवानांच्या स्वागताला संपूर्ण गावच नव्हे तर पंचक्रोशीतील नातेवाईकांनीही हजेरी लावली होती.

कुडाळ (जि. सातारा) : गाडीवरील छतावर रूबाबात उभे राहिलेले लष्करी जवान.. दिमतीला बॅंडबाजा आणि ताल धरणारी लेझीम पथकातील मुले... त्याचबरोबर फुलांचे हार घेऊन उभे राहिलेले संपूर्ण गाव... अशा अभूतपूर्व स्वागत मिरवणुकीने कुडाळला जावळीतील दहा सेवानिवृत्त जवानांचा सन्मान करण्यात आला.
 
जावळी तालुक्‍यातील 10 जवान काही दिवसांपूर्वी लष्करातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांना अनोखी भेट म्हणून कुडाळ, हुमगाव, आखाड्यासह तालुक्‍यातील अनेक गावांतील ग्रामस्थांनी एक समिती तयार केली. ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर्स लावले. घरोघरी रांगोळी काढल्या व या जवानांचे गावांत आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्‍यांच्या आतषबाजीत त्यांचे भव्यदिव्य मिरवणुकीद्वारे स्वागत केले. मान्यवरांच्या उपस्थितीत नागरी सत्काराद्वारे त्यांचा सन्मानही केला.

हेही वाचा- Video : प्रेमीयुगलास मारहाण योग्य नव्हे : रिंकू राजगूरु

अनोख्या स्वरूपात जन्मभूमीत झालेले स्वागत पाहून सर्वच जवान भारावून गेले होते. अक्षरश: गावकऱ्यांचे प्रेम पाहून डोळ्यांच्या कडा पाणावल्या. जवानांच्या स्वागताला संपूर्ण गावच नव्हे तर पंचक्रोशीतील नातेवाईकांनीही हजेरी लावली होती. 
प्रारंभी या जवानांची कुडाळ ते हुमगाव अशी मिरवणूक काढण्यात आली तर ठिकठिकाणी कुटुंबांच्या वतीने गोडधोड भरवून त्यांचे औक्षण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवाजी जाधव, ज्ञानेश्वर शेलार, प्रशांत तरडे, सागर भोगावकर, राजेंद्र करंदकर, ज्ञानेश्वर गोळे, तानाजी पवार, रवींद्र परामणे, सयाजीराव शिंदे आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired Jawans Feliciatied In Kudal District Satara

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: