परतीचा पाऊस ठरला कोवाडमधील ज्वारीस पोषक

अशोक पाटील
शनिवार, 18 जानेवारी 2020

यंदा तिरमाळ व दिंडलकोप परिसरात ज्वारीचे पिक चांगले बहरले आहे. परतीचा पाऊस अन्य पिकांना अडचणीचा ठरला असला तरी ज्वारी पिकाला तो पोषक ठरला आहे. चंदगड तालक्‍यात किमान दोनशे एकरात ज्वारीचे पिक घेतले जाते. पुढील काही दिवस थंडीचे वातावरण राहिल्यास यावर्षी ज्वारीच्या उत्पादन चांगली वाढ होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

कोवाड ः यंदा तिरमाळ व दिंडलकोप परिसरात ज्वारीचे पिक चांगले बहरले आहे. परतीचा पाऊस अन्य पिकांना अडचणीचा ठरला असला तरी ज्वारी पिकाला तो पोषक ठरला आहे. चंदगड तालक्‍यात किमान दोनशे एकरात ज्वारीचे पिक घेतले जाते. पुढील काही दिवस थंडीचे वातावरण राहिल्यास यावर्षी ज्वारीच्या उत्पादन चांगली वाढ होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

तिरमाळ व दिंडलकोप परिसरात काळीभोर जमीन आहे. तसेच उंच टेकडीचा जमिनीला उतार असल्याने पाण्याचा निचरा होतो. त्यामुळे येथील शेतकरी वर्षभरात भात, सोयाबीन, बटाटा पिकांच्या काढणीनंतर ज्वारीचे पिक घेतात. ऑक्‍टोंबरअखेरीपासून जोंधळ्याच्या पिकाची पेरणी केली जाते. जमिनीतील ओलाव्यावर पेरणी केली जाते. गेल्या दोन चार वर्षात शेतकऱ्यांना पेरणीवेळ जमिनीत ओलावा मिळत नसल्याने ज्वारीच्या उत्पादात कमालीची घट झाली आहे.

यावर्षी मात्र या भागात परतीचा पाऊस चांगला झाला. त्यामुळे जमिनीत ओलावा चांगला राहिल्याने ज्वारी पेरणी चांगली झाली. पिकाच्या उगवणीला बळकटी मिळाली. उगवणीनंतर लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाला, पण शेतकऱ्यांनी तात्काळ किटकनाशकांची फवारणी घेतल्याने पिक जोमात आले आहे. आता ज्वारीचे कणीस दाणेदार आले आहे. कडाक्‍याच्या थंडीचा या पिकाला फायदा झाला आहे. सध्या कडाक्‍याच्या थंडीचे वातावरण आहे. हे असेच राहिल्यास यावर्षी जोंधळ्याचे उत्पादन चांगले मिळेल, असा अंदाज शेतकऱ्यांचा आहे.यंदा एकरी सात ते आठ क्विंटल ज्वारीचे उत्पादन होईल, असे चित्र आहे.

ज्वारीचे देशी वाण असल्याने सध्या बाजारात ज्वारीला क्विंटलला 4 ते 5 हजार दर आहे. तसेच कडबा हा जनावरांचा उत्तम चारा असल्याने शेकडा 2 हजारपर्यंत त्यालाही भाव आहे. शेतकऱ्यांनी ज्वारीच्या संकरीत जातीच्या बियाणांचा वापर केला तर एकरी भरघोस उत्पादन मिळू शकते, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे, पण कडबा हा जनावरांचा मुख्य चारा असल्याने येथील शेतकऱ्यांनी ज्वारीचे देशी बियाणाचे वाण जपले आहे. ज्वारीला चवही उत्तम असल्याने या भागातील शेतकऱ्यांच्याकडे ज्वारीची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र व्यापारी ज्वारीचे दर पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या पिकाला निश्‍चित बाजरभावाची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

ऊस पिकाला ज्वारी पर्याय

दिंडलकोप परिसरातल ज्वारीचे चांगले उत्पादन आले आहे. ज्वारीचे देशी बियाणे असल्याने येथील ज्वारीला मोठी मागणी आहे. शेतकऱ्यांनी संकरीत बियाणांचा वापर केला, तर अजून उत्पादन वाढू शकते. ज्वारीचा बाजारभाव विचारात घेतला तर ऊस पिकाला ज्वारीचे पिक नक्की पर्यायी होऊ शकते, अशी सध्याची स्थिती आहे. 
- एस. डी. मुळे, कृषी सहाय्यक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Return Monsoon Rain Helpful for Kowad Farmers Kolhapur Marathi News