पृथ्वीराज चव्हाण यांना आम्ही दिल्लीला पाठवू - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

सचिन शिंदे
बुधवार, 23 मे 2018

पृथ्वीराज चव्हाण यांच्या होम पीचवर येवून चंद्रकांत पाटील यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस त्यावर काय प्रतिक्रीया देणार, त्यांची व्यूव्हरचना काय असणार याकडे आता लक्ष लागून आहे. 

कऱ्हाड - माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिकांच्या निवडणुकीत लक्ष घालू नये, त्यांनी दिल्लीला जावे. ते जाणार नसतील तर आम्ही त्यांना पाठवू असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मलकापूरात झालेल्या सभेत दिला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय खल सुरू झाला आहे. त्यांच्या सभेला निमित्त होते, मलकापूरच्या निवडणुकीचे, मात्र भाजपचे प्रत्यक्ष टार्गेट पृथ्वीराज चव्हाण होते, हेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या होम पीचवर येवून चंद्रकांत पाटील यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस त्यावर काय प्रतिक्रीया देणार, त्यांची व्यूव्हरचना काय असणार याकडे आता लक्ष लागून आहे. 

निवडणुक कोणतीही असे, अथवा विरोधी पक्षातील कोणताही नेता असो, त्याची कऱ्हाडमध्ये जाहीर सभा झाली अथवा पत्रकार परिषद झाली की, तो नेता पृथ्वीराज चव्हाण यांनाच टार्गेट करतो. या भागातील रूढ झालेला हाच शिरस्ता आहे. याच पद्धतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, नारायण राणे, एमआयएमचे अस्साउद्दीन ओवीसी यांच्यासह अनेक दिग्गज ज्या ज्यावेळी येथे आले. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना टार्गेट केले. मात्र त्यांच्या टिकांना काही वेळाच प्रत्युत्तर दिले गेले. मात्र काल परवा मंत्री चंद्राकात पाटील यांच्या झालेल्या सभेत जी टिका झाली. त्या टिकेने काँग्रसेच्या गोटात विशेष करून पृथ्वीराज चव्हाण यांना मानणाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसली. त्यामागे मलकापूरच्या निवडणुकीचे कारण तर आहेच. त्याशिवाय़ होम पीचवर येवून आव्हान दिल्याने त्यांच्यात अस्वस्थता दिसली. भाजपचे नेते अतुल भोसले यांना मलकापूरच्या निवडणुकीत यश यावे, यासाठी झालेल्या जाहीर सभेने तालुक्याच्या राजकारणात वेगळाच राजकीय रंग भरल्याचेही या निमित्ताने दिसून आले. अनेक तार्कीक राजकीय आडाखे बांधले जात आहे. मलकापूरवर सध्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाची म्हणजेच मनोहर शिंदे यांची सत्ता आहे. त्यांनी गतवेळी अतुल भोसले यांना सोबत घेवून विरोधकांना चारीमुंड्या चीत करत 17-0 असा इतिहास रचला. आज स्थिती जरा बिकट झाली आहे. अतुल भोसले भाजपमध्ये गेल्याने तेथे शिंदे यांना प्रतिस्पर्धी तयार झाला आहे. साम-दाम-दंड-भेद याचा वापर निवडणुकीत होईलही. मात्र विरोधकांच्या वेगवेगळ्या आरोपांना व त्यांच्या रणनिती नेमके काय उत्तर देणार याची उत्सुकता लागून आहे. भाजप पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कडाडून विरोध करणार आहे, ते काल परवाच्या सभेवरून स्पष्ट झालेच आहे. त्यामुळे त्या रणनितीच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण नक्की कोणती व्यूव्ह रचना आखणार त्याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. 

विकासाचा अजेंडा काय -
निवडणुक कोणतीही असली तरी राजकीय आखड्यात तेच आरोप व त्याला तीच प्रत्युत्तरे असतात. त्याच्या फैरी एक सारख्याच असतीलही. मात्र काँग्रेस व भाजपला विकासाचा अंजेडा स्वतंत्र देण्याचे आव्हानही पेलावे लागणार आहे. त्याचे आव्हान पक्ष व नेते कसे पेलणार हेही त्याच वेळी स्पष्ट होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Revenue Minister Chandrakant Patil Talks About Prithviraj Chavan