"त्यांच्या' कष्टाला पुरस्काराचे फळ

दौलत झावरे
रविवार, 8 डिसेंबर 2019

प्राथमिक शाळेतील शिक्षक विक्रम अडसूळ, रवींद्र भापकर व सोमनाथ वाळके यांचे सुरू होते. त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील माहिती व तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या कामाची दखल केंद्र स्तरावर घेण्यात आली असून, त्यांना आयसीटी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. 

नगर ः फळाची अपेक्षा न करता काम करत राहिले की, त्या कामाची दखल नेहमीच घेतली जाते. फक्त ते काम समाजहिताचे असावे लागते. असेच समाज हिताचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळेतील शिक्षक विक्रम अडसूळ, रवींद्र भापकर व सोमनाथ वाळके यांचे सुरू होते. त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील माहिती व तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या कामाची दखल केंद्र स्तरावर घेण्यात आली असून, त्यांना आयसीटी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

भारत सरकारच्या मानव संसाधन व विकास मंत्रालय व शिक्षण विभाग यांच्यातर्फे आयसीटी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार या वर्षी जिल्ह्यातील बंडगरवस्ती (ता. कर्जत) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक विक्रम अडसूळ, सदरवाडी (ता.जामखेड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील रवींद्र भापकर व पारगाव जोगेश्‍वरी, (ता. आष्टी, जि. ः बीड) येथील प्राथमिक शाळेतील सोमनाथ वाळके या शिक्षकांना जाहीर झाला आहे.

पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा परिचय

विक्रम अडसूळ ः

हे बंडगरवस्ती (ता. कर्जत) येथील दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. त्यांच्या शाळेत एक ते चार वर्ग आहेत. शाळेत एकूण दोन शिक्षक कार्यरत असून, 27 विद्यार्थ्यांची पट संख्या आहे. अडसूळ यांनी आतापर्यंत विविध आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना संपूर्ण भारतभर उपक्रमशील, प्रयोगशील व तंत्रस्नेही शिक्षण म्हणून ओळखले जाते. मेंढपाळ कुटुंबाची वस्ती असलेल्या बंडगरवस्ती या शाळेत ते तंत्रज्ञानाचे प्रयोग करतात. या वस्तीकडे जायला धड रस्ताही नाही. सुरवातीला विक्रम अडसूळ यांनी छोट्या लघुपटांची निर्मिती केली.

हेही वाचा ःतीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार

अध्यापन करताना ते फेसबुक,यू-ट्यूबवरील अभ्यासोपयोगी व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवतात. त्यांच्या शाळेचे व स्वतःचे यू-ट्यूब चॅनेल ही आहे. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे परदेशातील शाळेतील मुलांशी संवाद साधला जातो. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थी व शिक्षकांसाठी तसेच तंत्रज्ञानात शिक्षणाला गती देण्यासाठी "ऍक्‍टिव्ह टीचर्स महाराष्ट्रात' हा समूह त्यांनी तयार केला असून, त्यात दहा हजार शिक्षक कार्यरत आहेत. www.atmmaharshtra.in ही वेबसाइट आणि www.krutishilshikshak.blogspot.असा ब्लॉग तयार करून त्यावर विविध शैक्षणिक विषयांवर त्यांनी लेखन केले आहे. राज्याच्या अभ्यासक्रम समितीचा सदस्य म्हणून काम करताना सहावी व सातवीच्या पाठ्यपुस्तकात क्‍यूआर कोड चा वापर करण्यासाठी व कंटेंट निवडण्यासाठी अडसूळ यांनी काम केले आहे.

रवींद्र भापकर ः सरदवाडी (ता. जामखेड) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये एक ते चार वर्ग असून, विद्यार्थ्यांची 45 पटसंख्या आहे. याच शाळेवर रवींद्र भापकर हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी www.ravibhapkar.in या राज्यातील सर्वाधिक पसंतीच्या शैक्षणिक संकेतस्थळाची निर्मिती केली. या संकेतस्थळास आतापर्यंत सुमारे 30 लाख जणांनी भेटी दिल्या आहेत. याचा विक्रम झाला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक व्हीडीओ, ऑनलाइन टेस्ट, ऍन्ड्रॉईड ऍपची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन टेस्ट घेतल्या जात आहेत. शाळा व राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ते उपयुक्त ठरले आहे. राज्य (SCERT)तसेच देश (NCERT) पातळीवर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. राज्य ई कंटेंट निर्मिती समूहाचा सदस्य, बालभारती तसेच दीक्षा व मित्रा ऍपसाठी साहित्य निर्मिती करण्यात येत आहे. आपल्या शाळेतील गुणवत्ता विकास उपक्रमांचे शिक्षणाच्या वारीद्वारे राज्यभर प्रदर्शन भरविण्यात आले आहेत. आयसीटीच्या उपयोगाने गुणवत्ता वाढवता येते हे सिद्ध करून त्याचा राज्यभर प्रसार व प्रचार करण्यात आला आहे. सरल प्रणालीमध्ये शिक्षकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी या माध्यमातून मदत करण्यात आली आहे. शाळेतील दोन्ही वर्गात स्मार्ट इंटरॅक्‍टिव्ह बोर्डाची सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण उपलब्ध करून दिले. सर्व वर्ग इंटरॅक्‍टिव्ह असणारी जिल्ह्यातील पाहिली शासकीय शाळा ठरली आहे.

शाळा विकासासाठी परदेशातील व्यक्तींची मदत. Transform Maharashtra या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमात राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रतिनिधित्व. राज्यातील शिक्षकांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी राज्यभरात 100 अधिक कार्यशाळांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

सोमनाथ वाळके ः पारगाव जोगेश्‍वरी, (ता. आष्टी, जिल्हा ः बीड) येथील प्राथमिक शाळेत एक ते सातपर्यंत वर्ग असून, आठ शिक्षक येथे कार्यरत आहेत. या शाळेची पटसंख्या 221 आहे. याच शाळेत सोमनाथ वाळके हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कल्पकतेतून राज्यातील एक मॉडेल डिजिटल शाळा उभी केली आहे. पेनसोबतच या विद्यार्थ्यांच्या हातात संगणकाचा माऊस व टॅब देण्यात आला आहे. शाळेतील विद्यार्थी संगणक व टॅबवर शिक्षण घेत आहेत. शाळेत टचस्क्रीन स्मार्टबोर्ड असून, या बोर्डवर विद्यार्थी विविध ऍक्‍टिव्हिटी करत स्मार्ट व आनंददायी पद्धतीने शिक्षण घेत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप हा शाळेचा असाच आगळावेगळा प्रयोग, या उपक्रमांतर्गत ही शाळा जगभरातील विविध शाळांशी जोडली गेली असून, या शाळेचे विद्यार्थी अमेरिका, इंग्लंड, जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका यासह विविध देशांतील विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधत माहितीचे आदानप्रदान करतात. शाळेतील विद्यार्थ्यांचा निकाल संगणकावरच तयार केला जात आहे.

पाठ्यपुस्तकातील कवितांना चाली लावल्या असून, या कविता शाळेतच रेकॉर्ड केलेल्या आहेत. त्यासाठी सोमनाथ वाळके यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सहकार्यातून शाळेत सुसज्ज असा रेकॉर्डिंग स्टुडिओ उभा केला आहे. बीड जिल्ह्याची स्मार्ट मॉडेल शाळा असणाऱ्या या शाळेला सोलापूरच्या प्रिसिजन उद्योगसमूहाने अडीच लक्ष रुपयांचे ई लर्निंग किट दिले आहे. यात स्मार्टबोर्ड, प्रोजेक्‍टर, लॅपटॉप, कलर प्रिंटर, होम थिएटर यासह सोलर सिस्टीमचा समावेश आहे. भारनियमनामुळे शाळेचा डिजिटल वर्ग आता बंद राहत नाही. कारण शाळेत सोलर सिस्टीम प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे 24 तास वीजपुरवठा सुरू असतो. वाळके यांच्या या कार्यामुळे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला असून, विविध संस्थांनी देखील त्यांना गौरविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "The reward of their 'hard work