रस्ता खुदाई करून  कर्नाटकातील चोरटी वाहतूक बंद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

म्हैसाळ, (सांगली): कर्नाटक राज्यातून शिरोळ तालुक्‍यातील गणेशवाडी गावाजवळून म्हैसाळ ( ता. मिरज) येथील श्री कनकेश्वर मंदिरा नजीक असलेल्या शौर्य अकॅडमीला जाणाऱ्या रस्त्यावरून सुरु असलेली चोरटी वाहतूक आज (ता.4) पोलीस प्रशासन आणि मिरज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी या रस्त्यांची खोदाई करून सदरचा रस्ता बंद केला. यातून पोलीस देखील सतर्क झाले असून अशा महाभागावर पोलिस कारवाई होणार असल्याचे थेट संकेत मिळत आहेत. 

म्हैसाळ, (सांगली): कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आणि जिल्ह्याच्या सर्व सीमा अत्यावश्‍यक वाहतूक सोडून बंद करण्यात आल्या आहेत. सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. यातूनही काही महाभाग अशा चोरट्या मार्गाने इकडे तिकडे फिरण्याचा फंडा वापरताना दिसत आहेत. सदरच्या रस्त्यावरून पूर्वी वाहतूक सुरू असायची. सध्या या रस्त्यावरून अपवादानेच मोठी वाहतूक सुरु असते. अन्यथा येथील शेतीसाठी जाणाऱ्या लोकांसाठी हा रस्ता वापरण्यात येत असतो. सध्या सीमेवर कडक पोलिस बंदोबस्त असल्याने रिकाम टेकड्यांना या रस्त्याचा साक्षात्कार झाला. आणि येथून मोटरसायकली, ट्रॅक्‍टर, छोटी वाहने म्हैसाळ आणि येथून मिरजेकडे असा प्रवास सुरू झाला. 

याची माहिती ग्रामपंचायती सह पोलिसांना कळताच यावर तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यानंतर सदरचा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जेसीबीच्या साह्याने गणेशवाडी कडे जाणारा रस्ता खोदून येथे मोठा बांध घालण्यात आला असून हा रस्ता वाहतकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.यावेळी म्हैसाळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बी. आर. कुंभार, तलाठी श्री. कुणके आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road closure of traffic in Karnataka