वाळू तस्करी रोखण्यासाठी नदी पात्राकडे जाणारे रस्तेच केले बंद 

संतोष कणसे
Monday, 5 October 2020

कडेगाव तालुक्‍यात येरळा नदीतील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसुल विभागाने कारवाई करीत वांगी, शेळकबाव आदी ठिकाणी नदी पात्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर चरी काढून रस्ते बंद केले आहेत

कडेगाव (जि. सांगली) : तालुक्‍यात येरळा नदीतील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसुल विभागाने कारवाई करीत वांगी, शेळकबाव आदी ठिकाणी नदी पात्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर चरी काढून रस्ते बंद केले आहेत. 

सध्या कोरोना महामारीमुळे महसूल प्रशासन उपाय योजना करण्यात व्यस्त आहे. त्याचा गैरफायदा घेत तालुक्‍यातील वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणात येरळा नदीतून वाळू उपसा करण्यास सुरुवात केली आहे. तर वडीयेरायबाग, शिवणी, नेवरी, कान्हरवाडी, येतगाव, तुपेवाडी नदीक्षेञातील रस्ते खुले आहेत. या गावातील हद्दीत मोठ्या प्रमाणात वाळु तस्करांनी उच्चाद मांडला आहे. यात महसुल व पोलीस विभागातील काहींच्या पाठिंब्यावर तस्करी सुरु होती.

तालुक्‍यात ताकारी टेंभू योजनेचे पाणी आल्याचे आर्थिक सुबत्ता वाढली आहे. त्यातुन मोठ्या प्रमाणात इमारत बांधकामे सुरू आहेत. अनेक शासकीय कामेही सुरु आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर उच्च दर्जाच्या येरळा नदीच्या वाळूला मागणी आहे. खर्चापेक्षा दहा पट जादा पैसे वाळु तस्करांना मिळत आहेत. त्यामुळे रात्रभर वाळु चोरून दिवसा आलिशान गाडीतुन फिरणाऱ्या वाळु तस्करांचा तरूणाईवर प्रभाव पडला जात आहे. अनेक तरूण वाळु तस्करीमध्ये गुंतले आहेत. यातुन गुन्हेगारी घटनेतही वाढ झाली आहे.

वाळुच्या वाहनाने आता पर्यत तालुक्‍यातील पंधरा बळी गेले आहेत. 
तर येरळा नदी काठावरील अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने हालचाली सुरु केल्याने संबंधित वाळू तस्करांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत. 

चोरीची वाळु कोणीही खरेदी करु नये

तालुक्‍यातून वाळु तस्करीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून महसुल विभागातील तलाठी व पोलीस प्रशासनास तस्करांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. नदीपाञात चरी काढण्याचे काम सुरु आहे. चोरीची वाळु कोणीही खरेदी करु नये. गावा-गावातील वाळुसाठ्याचे पंचनामे करण्याचे गावकामगार तलाठी यांना आदेश देण्यात आले आहेत. - 

- डॉ.शैलजा पाटील, तहसीलदार,कडेगाव 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The road leading to the river basin was closed to prevent sand smuggling