इथल्या रस्त्यांची वाट झाली मोकळी, आता विकास धावत येणार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

स्थायी समितीच्या सभेत सभापती मुदस्सर शेख यांनी, भुयारी गटाराच्या कामामुळे रस्त्यांची कामे प्रलंबित असल्याचे सांगितले. मुख्य रस्त्यातील भुयारी गटाराचे काम पूर्ण करून रस्ते लवकर करावेत. कोठला रस्ता व सर्जेपुऱ्यातील हत्ती चौकातील रस्ता खराब झाल्याचे ते म्हणाले.

नगर ः भुयारी गटाराच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची कामे होत नसल्याने नगरसेवक गणेश भोसले यांनी स्थायी समितीच्या सभेत महापालिका अधिकाऱ्यांना, स्वतः ठेकेदार आणून काम सुरू करण्याचा आदेश दिला.

प्रशासनाने कामे लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. यात प्रथम तीन रस्त्यांची कामे केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता रस्त्यांच्या कामाचा "श्रीगणेशा' लवकरच होणार आहे. रस्ते झाल्यानंतर विकासासही चालना मिळेल. 

आठवडाभरात कामास सुरूवात

स्थायी समितीच्या सभेत सभापती मुदस्सर शेख यांनी, भुयारी गटाराच्या कामामुळे रस्त्यांची कामे प्रलंबित असल्याचे सांगितले. मुख्य रस्त्यातील भुयारी गटाराचे काम पूर्ण करून रस्ते लवकर करावेत. कोठला रस्ता व सर्जेपुऱ्यातील हत्ती चौकातील रस्ता खराब झाल्याचे ते म्हणाले.

प्रभारी शहर अभियंत्यांनी, त्या दृष्टीने सध्या पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. यावर भोसले म्हणाले, की प्रभाग 14मधील रस्ते खराब झाले आहेत. नागरिक पाठपुरावा करीत आहेत.
आठवडाभरात काम सुरू न झाल्यास ठेकेदाराला धरून आणून काम केले जाईल. लवकरात लवकर रस्त्याच्या कामाला मंजुरी द्या, अशी सूचना त्यांनी मांडली.

इथापे यांनी, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारे रस्ते, फलटण पोलिस चौकी ते सर्जेपुऱ्यातील श्रीराम पेट्रोल पंप व रामवाडी ते तारकपूर या तीन रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. 

शहरातील पाणीपुरवठा योजनेतून शहराजवळील काही गावांना पाणीपुरवठा केला जातो. यातील 10 गावांची 59 कोटी दोन लाख 36 हजार 10 रुपये पाणीपट्टी थकीत आहे. यावर सभापती शेख यांनी, या गावांना मागील थकबाकीचे एक बिल व चालू बिल, असे हप्ते पाडून देण्यास सांगितले.

 
शहरात रस्त्यावर बसून विविध वस्तूंची विक्री करणाऱ्यांकडून महापालिका रस्ता बाजू शुल्क आकारते. यात दीड वर्षात 13 लाखांचे नुकसान झाल्याचा आरोप सदस्यांनी केला. रस्ता बाजू शुल्काच्या वसुलीसाठी 24 लाख 50 हजार रुपयांच्या निविदेस मंजुरी देण्यात आली. 

या गावांची पाणीपट्टी थकीत 
शिंगवे नाईक- 46 लाख 44 हजार 570, देहरे- दोन कोटी 11 लाख 39 हजार 471, विळद- गवळीवाडा 52 लाख नऊ हजार 623, वरवंडी व अन्य पाच गावे- 42 कोटी आठ लाख 28 हजार 310, खारेकर्जुने- चार कोटी 45 लाख 51 हजार 741, शेंडी पोखर्डी- दोन कोटी 11 लाख 14 हजार 957, हिंगणगाव- चार कोटी 90 लाख 84 हजार 681, नागरदेवळे- 24 लाख 30 हजार 429, बुऱ्हाणनगर- दोन कोटी 12 लाख नऊ हजार 718, बुरुडगाव- 23 हजार 510 रुपये थकीत आहेत. 

हरितपट्टे बनविण्याची माहितीच नाही 
अमृत योजनेतील हरितपट्टे बनविण्याच्या कामासंदर्भात नगरसेवकांनी माहिती विचारली असता, त्याविषयी माहिती नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. नगरसेवकांनी, वृक्षकराचे स्वतंत्र संकलन व्हावे व वृक्षांच्या लागवडीसंदर्भात समिती स्थापन करावी, अशी सूचना केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road work started soon in Ahmednagar