पाच बोअरवेल्स गाड्यावर दरोडा : जत तालुक्‍यातील घटना : पाच पैकी चौघांना आरोपींना अटक

बादल सर्जे
Tuesday, 13 October 2020

अचकनहळ्ळी (ता. जत) रोडवर सोलनकर वस्तीजवळ पाच दरोडेखोरांनी काळ्या पिवळी गाडी आडवी लावून मंगळवेढ्याच्या दिशेने निघालेल्या पाच बोअरवेल्सवर दरोडा टाकून त्यांच्याकडील पन्नास हजार मुद्देमाल लुटले.

जत ( सांगली) : अचकनहळ्ळी (ता. जत) रोडवर सोलनकर वस्तीजवळ पाच दरोडेखोरांनी काळ्या पिवळी गाडी आडवी लावून मंगळवेढ्याच्या दिशेने निघालेल्या पाच बोअरवेल्सवर दरोडा टाकून त्यांच्याकडील पन्नास हजार मुद्देमाल लुटले. कपिल शामराव गजभिये (वय 28, रा. अथणी रोड, मुळ गाव बडनेरा, जि. अमरावती) यांना शिवीगाळ करून मारहाण ही करण्यात आली असून रविवारी रात्री 11 वाजता ही घटना घडली. याबाबत जत पोलीस ठाण्यात गजभिये यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी लखन चंद्रकांत पाथरूट (वय 30), निलेश सुखदेव घोडके (वय 28, दोघे रा. विठ्ठलनगर, जत), सागर आंबादास साळे (वय 30, रा. शिवाजी पेठ), अरविंद प्रकाश मोटे (वय 36, रा. अचकनहळ्ळी, ता. जत) व एक अनोळखी या पाच जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चार जणांना तात्काळ अटक केली आहे. या चार आरोपींना न्यायालयाने हजर केले असता त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कपिल गजभिये यांचा बोअरवेलचा व्यवसाय आहे. ते रविवारी रात्री 10.30 वाजता बालाजी बोअरवेल्स कंपनीच्या पाच बोअरवेल्स गाड्या घेऊन मंगळवेढ्याच्या दिशेने घेऊन निघाले होते. गाड्या जत शहरापासून पाच ते सह किलोमीटर अंतरावर असलेल्या अचकनहळ्ळी गावापासून एक किलोमीटरवर गेल्या असता वरील संशयित पाच दरोडेखोरांनी काळी पिवळी गाडी क्र. (एम. एच. 10 ए. डब्ल्यू 9459) बोअरवेल्स गाड्यांच्या आडवी लावली.

दरम्यान, वरील संशयित पाच दरोडेखोरांनी गाडीतून उतरून कपिल गजभिये यांच्या दिशेने आले. त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्‍यांनी मारहाण केली. त्यांच्याजवळ असलेले रोख पन्नास हजार रूपये व दोन मोबाईल काढून घेतले. या घटनेनंतर फिर्यादी कपिल गजभिये यांनी जत पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. जत पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल होत. दरोडेखोरांचे वर्णन व गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घेऊन चौवीस तासात त्यांना जेरबंद केले. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश मोहिते करत आहेत. 

दरोडेखोरांवर खूनासह अनेक गुन्हे..... 
दरोड्याच्या घटनेचा तपास करत असताना वरील पाच दरोडेखोरांवर खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा व गर्दी करून मारहाण करणे, आदीसह गुन्हे विविध पोलिस ठाण्यात नोंद असून या कारवाईच्या निमित्ताने दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले आहे.

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery at five borewell vehicles: Incidents in Jat taluka: Four out of five accused arrested