मोपेडची डिक्की फोडून पाच तोळ्यांचे दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - मोपेडची डिक्की फोडून चोरट्याने त्यातील खरेदी केलेले पाच तोळ्यांचे सोन्याचे नवीन दागिने हातोहात लंपास केले. गजबजलेल्या व्हिनस कॉर्नर येथील एका दागिन्यांच्या शोरूमच्या दारात भरदिवसा हा प्रकार घडला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद आहे. याबाबतची फिर्याद सुनील बाळू डोंगळे यांनी दिली. 

कोल्हापूर - मोपेडची डिक्की फोडून चोरट्याने त्यातील खरेदी केलेले पाच तोळ्यांचे सोन्याचे नवीन दागिने हातोहात लंपास केले. गजबजलेल्या व्हिनस कॉर्नर येथील एका दागिन्यांच्या शोरूमच्या दारात भरदिवसा हा प्रकार घडला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद आहे. याबाबतची फिर्याद सुनील बाळू डोंगळे यांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः डोंगळे (वय ३५) सुर्वेनगर येथे राहतात. ते एका खासगी कंपनीत नोकरी करतात. ते सोमवारी (ता. ७) सायंकाळी कुटुंबासोबत मोपेडवरून सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांनी दसरा चौक परिसरातील एका शोरूमधून चार तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि एक तोळ्याचे गोल पॅडेल, असे पाच तोळ्यांचे दागिने खरेदी केले. हे दागिने त्यांनी मोपेडच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर दुसरे दागिने खरेदीसाठी ते व्हिनस कॉर्नर येथे गेले.

येथील एका शोरूमच्या दारात त्यांनी सव्वासहाच्या सुमारास मोपेड उभी केली. त्यानंतर ते शोरूमध्ये दागिने खरेदीसाठी गेले. दरम्यान, चोरट्याने त्यांच्या गाडीची डिक्की फोडून त्यातील पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. दुकानातून बाहेर आल्यानंतर त्यांना मोपेडची डिक्की उघडी दिसली. त्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे समजले. तशी त्यांनी याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार पोलिस ठाण्यात दोन लाख १३ हजार ६४० रुपयांच्या चोरीची नोंद झाली. अत्यंत गजबजलेल्या रस्त्यावर सुरक्षारक्षक असतानाही चोरट्याने डिक्की फोडून सोन्याचे दागिने लंपास करून पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. 

सीसीटीव्हीत संशयित चोरटा कैद
शोरूमच्या दारात उभ्या केलेल्या मोपेडच्या अवतीभोवती एक जण संशयितरीत्या घुटमळत असल्याचे फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्यानुसार त्याचा शोध घेण्याचे पोलिसांनी सुरू केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery in Venus corner area near Ornament showroom in Kolhapur