संजय शिंदेंच्या भूमिकेमुळे संभ्रम वाढला; राष्ट्रवादीत चिंतेचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होऊ लागलेल्या गळचेपीचे कारण देत करमाळ्यातील बागल गटाच्या नेत्या रश्‍मी बागल यांनी पक्षाला राम राम ठोकत शिवबंधनाचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढलेल्या संजय शिंदे यांना आता करमाळा विधानसभा मतदारसंघ मोकळा झाल्याचे स्पष्ट होत असतानाच त्यांनी घूमजाव केल्याने अनिश्‍चिततेच्या राजकारणाची सुरवात झाल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. 

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होऊ लागलेल्या गळचेपीचे कारण देत करमाळ्यातील बागल गटाच्या नेत्या रश्‍मी बागल यांनी पक्षाला राम राम ठोकत शिवबंधनाचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढलेल्या संजय शिंदे यांना आता करमाळा विधानसभा मतदारसंघ मोकळा झाल्याचे स्पष्ट होत असतानाच त्यांनी घूमजाव केल्याने अनिश्‍चिततेच्या राजकारणाची सुरवात झाल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. 

दरम्यान, आगामी विधानसभेच्या निवडणुकीत करमाळ्याचे शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी कापून त्यांच्या जागी रश्‍मी बागल यांना आणण्याचा शिवसेनेचे संपर्कप्रमुख, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचा मनसुबा असल्याची चर्चा आहे. 

ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार पाटील यांनी शिवसेनेच्या चिन्हावर लढवून मोठे यश मिळविले आहे. मोहोळ येथील जाहीर सभेत त्यांनी मोहिते-पाटील यांचे उंबरठे झिजवू नका, असा आमदार पाटील यांना सल्ला दिला होता. यातून जनतेमध्ये वेगळाच संदेश गेला आहे. 
रश्‍मी बागल या राष्ट्रवादीच्या प्रांतिक सदस्या, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालिका आहेत. त्यांच्या गटाकडे दोन साखर कारखाने आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा जोमाने प्रचार केला होता. शिंदे यांचा पराभव झाला. 

करमाळा मतदारसंघात शिंदे यांचे कार्यकर्ते सध्या निवडणुकीच्या दृष्टीने जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. ते विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवतील, त्यांनाच उमेदवारी मिळेल, अशा समजातून रश्‍मी बागल यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीवेळीही त्यांनी वरिष्ठांच्या कानावर या बाबी घातल्या. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडे आपली घालमेल कळविली होती. 

दरम्यान, संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखतीवेळी मुलाखत दिलीच नव्हती. आताही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर त्यावेळच्या व आताच्या वातावरणात फरक पडल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपकडून ऑफर असतानाही आपण राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविल्याने चुकल्यासारखे वाटत असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे करमाळ्यातील राजकीय स्थित्यंतरात आणखी बदल होऊ घातल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली नाहीतर रश्‍मी बागल यांचा निर्णय चुकला काय? असा प्रश्‍न निर्माण होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The role of Sanjay Shinde has led to confusion