स्थायी सभापतीसाठी इच्छूकांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका

बलराज पवार 
Wednesday, 7 October 2020

महापालिका स्थायी समिती सभापतीसाठी इच्छूकांनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. नेत्यांच्या भेटी घेऊन आपले नाव चर्चेत आणल्यानंतर आता सदस्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

सांगली : महापालिका स्थायी समिती सभापतीसाठी इच्छूकांनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. नेत्यांच्या भेटी घेऊन आपले नाव चर्चेत आणल्यानंतर आता सदस्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

स्थायी समितीच्या नवीन आठ सदस्यांच्या निवडी झाल्यानंतर सभापती निवडीसाठी विभागीय आयुक्तांनी स्थायीसह चार प्रभाग समित्या आणि महिला बालकल्याण, समाजकल्याण समिती सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. यासाठी पुढील आठवड्यात ता. 14 रोजी निवडणूक होणार आहे. 

सर्वात लक्षवेधी निवडणूक स्थायी समितीची ठरणार आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे 9 तर कॉंग्रेसचे सात सदस्य असल्याने सत्ताधाऱ्यांकडे काठावरचे बहुमत आहे. त्यामुळे भाजपमधील नाराजांवर लक्ष ठेवून विरोधी महाआघाडी आपले डावपेच आखणार आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या पहिल्या दोन वर्षात सांगली आणि मिरजेला मिळाल्या होत्या. मात्र आता त्या कुपवाडला मिळाव्यात यासाठी भाजपचे कुपवाडचे सदस्य गजानन मगदूम आणि राजेंद्र कुंभार यांनी नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. यंदा कुपवाडला सभापतीपद मिळावे आणि ते आपल्यालाच मिळावे यासाठी दोन्ही सदस्यांनी फिल्डींग लावली आहे. 

त्याचबरोबर सांगलीतून सविता मदने आणि मिरजेतून पांडुरंग कोरे इच्छुक आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, खासदार संजय पाटील यांच्यासह कोअर कमिटी नेत्यांनाही साकडे घालण्याचे काम सुरु आहे. पुढील वर्षी होणाऱ्या महापौर पदाच्या निवडीचाही प्रभाव स्थायी समिती सभापतीच्या निवडीवर असणार आहे. त्यामुळेच या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

विरोधी महाआघाडीच्या नेत्यांचेही भाजपच्या हालचालींकडे लक्ष आहे. भाजपमध्ये सभापतीपदावरुन नाराजी होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन कॉंग्रेस, राष्ट्रवादीचाही उमेदवार रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न होणार आहे. काठावरचे बहुमत लक्षात घेता भाजप नेते सदस्यांची नाराजी होऊ नये यासाठी सर्व इच्छूकांना, "बघुया, अजून लांब आहे, कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय होणार आहे, चंद्रकांतदादांना इच्छूकांची नावे कळवून ते काय निर्णय देतात बघू, अशी सारवासारवीची भाषा करत आहेत. त्यामुळे इच्छूकांचेही जीव टांगणीला लागले आहेत.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The role of 'Wait and Watch' for the aspiring Speaker