राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरातून संचलन 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 October 2019

शहरात काल विजयादशमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सकाळी संचलन व शस्त्रपूजन करण्यात आले.

नगर - शहरात काल विजयादशमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सकाळी संचलन व शस्त्रपूजन करण्यात आले. मार्केट यार्ड चौकात जिजामाता प्रतिष्ठानातर्फे रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. घरोघरी शस्त्रे, पुस्तके, वाहने व वस्तूंचे पूजन करण्यात आले. अनेक जणांनी सोने-चांदी व वाहनांचीही खरेदी केली.

दसरा सण काल शहरात नागरिकांनी उत्साहात साजरा केला. सोशल मीडियावर व प्रत्यक्ष भेटून नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सकाळी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या प्रांगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शस्त्र व प्रतीकात्मक क्षेपणास्त्राचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संघाच्या स्वयंसेवकांनी शहरातून संचलन केले. माळीवाडा, माणिक चौक, चौपाटी कारंजामार्गे स्वयंसेवक पुन्हा भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल प्रांगणात आले.

सकाळीच नागरिकांनी बाजारातून फुलांची खरेदी केली. फुलांच्या माळा व तोरण तयार केले. देवपूजा करण्यात आली. सावेडीत सरदार अंताजी माणकेश्‍वर गंधे स्मृती न्यासातर्फे सरदार अंताजी माणकेश्‍वर गंधे यांच्या शस्त्रांचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर घरोघरी शस्त्रे, पुस्तके, वाहने व वस्तूंचे पूजन करण्यात आले. सायंकाळी मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात जिजामाता प्रतिष्ठानातर्फे रावणदहन करण्यात आले.

सायंकाळी नागरिकांनी सीमोल्लंघन करून नवीन व पारंपरिक कपडे परिधान केले होते. मार्केट यार्ड, खाकीदास बाबा मठ, दिल्ली गेट, पेमराज सारडा महाविद्यालय परिसर, प्रोफेसर कॉलनी चौक आदी ठिकाणी नागरिकांनी शमीपूजन केले. घटातील धान टोप्यांवर डौलात खोचून नागरिकांनी एकमेकांना सोने (आपट्याची पाने) देत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSs sanchalan on the occasion of vijaya dashmi in nagar