ग्रामीण आरोग्य यंत्रणा पूर्ण सक्षम... संपूर्ण कक्ष बाधित, तरी प्राजक्ता कोरे मैदानात 

अजित झळके
Friday, 18 September 2020

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 50 वर्षावरील 8 लाख 72 हजार लोकांचे सर्वेक्षण झाले. आता माझे कुटुंब, माझी जबाबदारी उपक्रमात सर्व ग्रामीण 22 लाखांवर लोकांचे सर्वे होईल.

सांगली ः जिल्हा परिषदेचा संपूर्ण अध्यक्ष कक्ष कोरोनाने बाधित आहे. अध्यक्षांचे स्विय सहायक, दोन शिपाई यांना बाधा झाली आहे. त्यानंतरही अध्यक्ष सौ. प्राजक्ता कोरे यांनी मैदान सोडलेले नाही. त्या दररोज जिल्हा परिषदेत येताहेत. कोविड सेंटरना भेटी देत आहेत. "जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा पूर्ण सक्षम झाली आहे, काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्वाचे आहे, तेच मी करतेय', असे त्यांनी सांगितले. 

त्यांनी जिल्हा परिषदेच्या चालू कामांचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, ""जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 50 वर्षावरील 8 लाख 72 हजार लोकांचे सर्वेक्षण झाले. आता माझे कुटुंब, माझी जबाबदारी उपक्रमात सर्व ग्रामीण 22 लाखांवर लोकांचे सर्वे होईल. त्यासाठी साडेचार हजार कर्मचारी कार्यरत आहेत. 2 हजार 600 ऑक्‍सिमीटर, 2 हजार 200 थर्मल स्कॅनर वाटप केले आहे. स्वीय निधीतून प्रत्येक मतदार संघात अडीच लाख रुपये दिले आहेत. 10 हजार अँटीजेन कीट खरेदी केले आहेत. औषधांचा कोणताही तुटवडा जाणवणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. ग्रामपंचायतींना एक लाखापर्यंत उपायोजना निधी खर्चाला मान्यता दिली आहे.'' 

त्या म्हणाल्या, ""जिल्हा क्रीडा संकुलात 140 बेडचे केअर सेंटर सुरु झाले आहे. आता प्राथमिक आरोग्य केंद्रांत 240 बेड ऑक्‍सिजनसह उपलब्ध केले आहेत. रुग्णवाहिका तत्पर आहेत. जिल्हा परिषदेतील कक्षाव्दारे लोकांशी नियमित संवाद सुरु आहे. समुपदेशन केले जात आहे. गृह विलगीकरण अत्यंत यशस्वी होत असून ग्रामीण रुग्णांना वेळेवर व उत्तम सेवा देण्यासाठी सर्व ते प्रयत्न आहेत. तालुक्‍याच्या ठिकाणी कक्ष स्थापन झाल्याने जिल्ह्यावरील ताण कमी होणार आहे.'' 
 

"प्राणवायू' दान करूया 

प्राजक्ता कोरे म्हणाल्या, ""प्राथमिक आरोग्य केंद्रात बेडची संख्या वाढवताना ऑक्‍सिजनसाठी लोकांनी पुढे यावे. सामाजिक संस्था, संघटना, गणेश मंडळांनी या ठिकाणी ऑक्‍सिजन मशीन, सिलिंडर, जंबो सिलिंडर मदत म्हणून द्यावीत. प्राणवायू दान करूया, जीवदान देऊया.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rural health system is fully operational ... the entire room is disrupted, but Prajakta kore is in a field