
कर्नाटक एस.टी. परिवहन महामंडळातील कर्मचा-यांच्या संपामुळे कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. लाखो प्रवाशांची एवढी प्रंचड गैरसोय होत असूनही प्रवासी संघटनांसह सर्वच जण गप्प आहेत.
मिरज : कर्नाटक एस.टी. परिवहन महामंडळातील कर्मचा-यांच्या संपामुळे कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. लाखो प्रवाशांची एवढी प्रंचड गैरसोय होत असूनही प्रवासी संघटनांसह सर्वच जण गप्प आहेत. लोकप्रतिनिधींनी तर या समस्येकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्याचा अचूक लाभ उठवत खासगी वाहतुकदारांनी प्रवाशांकडून भरमसाठ भाडे वसूल करून लुटमार सुरु केली आहे.
सांगली, मिरज आणि आसपासच्या ग्रामीण भागातून कर्नाटकात नियमितपणे किमान 50 ते 60 हजार प्रवाशांची वाहतूक होत असते. कागवाड, शिरगुप्पी, उगार, कुडची, अथणी, निपाणी, विजापूर, शिंदगी, गुलबर्गा, ताळीकोट, बागलकोट, हुबळी, धारवाडसह बंगळुरूपर्यंत हजारो प्रवासी सांगली, मिरजेतून कर्नाटकात जातात. म्हैसाळ, कोल्हापूर, इचलकरंजीकडे जाण्यासाठीही कर्नाटक एस.टी. महामंडळाच्या गाड्यांचा लाभ मिरज स्थानकातील हजारो प्रवाशांना होतो. शुक्रवारी (ता.11) सकाळपासून सुरू झालेल्या कर्नाटक परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे.
मिरज बस स्थानकावरून कर्नाटकात किमान साडेतीनशेहून अधिक प्रवासी गाड्यांचा ताफा मिरज, सांगली बस स्थानकांवर कर्नाटक एस.टी. महामंडळाने तैनात केला आहे. कर्नाटक एस.टी. महामंडळाने मिरज बस स्थानकावरील चार फलाट अनेक वर्षांपासून आरक्षित केले आहेत. या फलाटांवर सध्या प्रवासी नसल्याने शुकशुकाट आहे.
कर्नाटक सीमेवरील अनेक गावांचा सांगली-मिरजेशी निकटचा संपर्क आहे. कर्नाटक सीमेवरील तसेच विजयपूर, बेळगाव, गुलबर्गा, बागलकोट या शहरातील रुग्ण, व्यापारी, विद्यार्थ्यांसह अनेक व्यवसायातील हजारो लोक नियमितपणे सांगली, मिरजेला येतात. त्यांच्या प्रवासासाठी सध्यातरी कर्नाटक एस. टी. महामंडळाच्या प्रवासी गाड्यांसह खासगी प्रवासी गाड्यांसह अन्य कोणताही पर्याय नाही. या अडचणीचा अचूक लाभ घेत खासगी वाहनचालकांनी प्रवाशांकडून बेसुमार भाडे वसूली करून लूटमार चालवली आहे. ही लुटमार होऊनही सामान्यांना धोकादायकपणे पद्धतीने प्रवास करावा लागत आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षच :
सांगली जिल्ह्यातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सांगली, मिरज आणि कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी समस्येत लक्ष घातले नाही. साहजिकच रस्त्यावरील सामान्य प्रवासी लोकप्रतिनिधींकडून नेहमीप्रमाणे दुर्लक्षितच राहिला.
संपादन : प्रफुल्ल सुतार