'शेतकरी हिताच्या नियमनमुक्ती'च्या समर्थनार्थ सदाभाऊंचे प्रतिआंदोलन

घनश्‍याम नवाथे
Saturday, 22 August 2020

शेतकरी हिताच्या नियमनमुक्ती कायद्याला समर्थन देणाऱ्या रयत क्रांती संघटनेच्यावतीने आज कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांचा निषेध करण्यात आला.

सांगली : शेतकरी हिताच्या नियमनमुक्ती कायद्याला समर्थन देणाऱ्या रयत क्रांती संघटनेच्यावतीने आज कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांचा निषेध करण्यात आला. कोल्हापूर रस्ता येथे विष्णूअण्णा पाटील फळमार्केटसमोर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली प्रतिआंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने बाजार समित्यांची मक्तेदारी संपवण्याचा दूरगामी आणि शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे. एक देश एक बाजार ही सुटसुटीत संकल्पना राबवून शेतकऱ्यांचा श्वास मोकळा केला असल्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

ते म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशातील शेतीमालाला खुली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी वटहुकूम काढला आहे. गेली कित्येक वर्षे शेतीमाल समितीमध्येच विकला पाहिजे हा काळा कायदा शेतकऱ्यांच्या छाताडावर बसला आहे. पण केंद्राने बाजार समित्यांची मक्तेदारी संपवण्याचा शेतकरी हिताचा निर्णय घेतल आहे. धान्य, कडधान्य, तेलबिया आणि कांदा व बटाटा पिके अत्यावश्‍यक कायद्यातून वगळली. आदरणीय शरद जोशी यांनी सांगितलेल्या शेतकरी स्वातंत्र्याची पहाट उगवत आहे. शेतकऱ्यांच्या खळ्यावर आणि मळ्यावर व्यापारी जाणार आहेत. समोरासमोर सौदे होणार आहेत. बंदिस्त मार्केट कमिटीतील लपवाछपवी चालणार नाही. जाचक मार्केट सेस संपुष्टात येणार आहे. घामाचे दाम डोळयांसमोर ठरवण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे.'' 

ते म्हणाले, ""केंद्र सरकारच्या निर्णयाने निर्यातीला चालना मिळून शेतीमालाच्या प्रक्रिया उद्योगातही वाढ होणार आहे. शेतकरी स्वातंत्र्याची पहाट होत असताना काही मतलबी संघटनाना हाताशी धरून वर्षानुवर्षे बाजार समितीत राजकीय अड्डा केलेल्या राजकीय पक्षांनी या विरोधात बंदचा निर्णय घेतला आहे. गेली अनेक वर्षे अजगरासारखी मिठी मारुन बसलेल्या बाजार समितीतील धेंडांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? शेतकऱ्यांच्या घामावर पोसलेल्या या लोकांनी शेतकऱ्यांच्या गळ्यात मात्र फास घातला आहे.

रयत क्रांती संघटना शेतकऱ्यांचे हे शोषण सहन करणार नाही. शेतकऱ्यांच्या दारात आलेल्या या स्वातंत्र्याच्या नरडीला नख लावण्याच्या प्रयत्नाचा आम्ही निषेध, धिक्कार आणि विरोध करीत आहोत.'' 
बजरंग भोसले, विनायक जाधव, दिलीपराव माणगावे, प्रकाश कोळी, पांडुरंग बसुगडे, आकाश राणे, अल्ताफ मुल्ला, सर्फराज डाके, सोनू उबाळे, अमित काळे, दादा मेंगाणे, अक्षय सपाटे, संग्राम भोसले व कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sadabhau's counter-agitation in support of the deregulation law