बैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sadananda Kadam writes about Vehicle license for bullock cart tangas permit with signature of District Police

रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे.

बैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना

रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं.

- सदानंद कदम

जागतिकीकरण आणि उदारीकरणामुळं अनेक क्षेत्रांचं रूप पालटलं. उद्योगविश्वाला चालना मिळाली. याला कारण ठरलं मुक्त परवाना धोरण. पण एक काळ असा होता की ‘परवाना’ हा चलनी शब्द होता. तेव्हा लोक म्हणायचे हे ‘परमिटराज’ आहे.

मुक्त अर्थव्यवस्थेत वाढलेल्या आजच्या पिढीला त्याची कल्पना येणार नाही. त्या काळच्या सत्यकथाही दंतकथा वाटतील. आज स्वयंचलित वाहन चालवायला परवाना लागतो, एवढाच त्यांचा अनुभव. पण तीस-पस्तीस वर्षांपूर्वी घरात रेडिओ लावायलाही परवाना लागायचा आणि दोन-अडीच इंच रुंदीची, पाच-साडेपाच फुटांची जाळीदार तारेची पट्टी ‘एरियल’ म्हणून घरात लावावी लागायची.

रेडिओसाठी परवाना शुल्काचं पुस्तक असायचं, आजच्या पोस्टाच्या बचत पुस्तकासारखं. दरवर्षीचं ठराविक परवाना शुल्क पोस्टात भरून, त्या पुस्तकावर शिक्का मारून आणावा लागायचा. आता मुठीतल्या भ्रमणध्वनीवर ‘आकाशवाणी’ ऐकणारांना ते पटणारही नाही. पण असं आठ रुपयांचं वार्षिक परवाना शुल्क भरून पोस्टातून शिक्का मारून आणलेलं ‘परवाना पुस्तक’ संग्रही आहे. आजचा विषय वेगळा.

शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा स्वयंचलित वाहनांनाच नाही तर, बैलगाडी आणि घोडागाडी (टांगा) चालवायलाही परवान्याची सक्ती होती. आपल्या वाहन चालवण्याच्या परवान्यावर रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असतो आणि त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावं लागतं. पण तेव्हा असा परवाना जिल्हा पोलिसप्रमुखांच्या सहीनं (सहीच्या शिक्क्यानं नव्हे) दिला जायचा आणि त्याचं दरवर्षी नूतनीकरण करावं लागायचं.

तुकाराम हरी चव्हाण, रा. सांगली यांना ९ ऑगस्ट, १९२० रोजी मिळालेला हा बैलगाडी चालवण्याचा परवाना. हे गृहस्थ म्हणजे सांगलीतल्या हनुमान ड्रेसेसचे तत्कालीन मालक. त्यांना मिळालेला हा परवाना २९९ क्रमांचा असून, दोन बैलांच्या गाडीसाठीचा आहे. त्यावर दोन्ही बैलांच्या रंगांची आणि वयाचीही नोंद आहे. बैलगाडीत चालवणाराखेरीज चार उतारूंना बसण्याची आणि जास्तीत जास्त ऐंशी पौंड वजनाची माल वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परवाना फी एक रुपया असून, त्याची मुदत ३१ डिसेंबर, १९२० पर्यंत असल्याची नोंद आहे.

जर ही बैलगाडी प्रवासी वाहतुकीसाठी वापरली तर प्रवाशांकडून भाड्याच्या स्वरुपात किती रक्कम घ्यावी, त्याचं दरपत्रकही जिल्हा पोलिसप्रमुखांनी ठरवून दिलं आहे. त्यासाठी एका बैलाच्या अगर एका घोड्याच्या गाडीचा दर वेगळा आहे आणि दोन बैलांच्या अगर दोन घोड्यांच्या गाडीचा दर वेगळा आहे. अंतरानुसार तो निरनिराळा आहे. ही बैलगाडी अगर टांगा भाड्यानं चालवायला दिला तर तासानुसार किती भाडे आकारावे, तेही नमूद केले आहे.

त्या काळी सांगली बस स्थानकापासून बुधगाव, हरिपूर, मिरज, शिरोळ, नरसोबावाडी, सांगली स्टेशन, माळ बंगला (आजचं स्वानंद भुवन पॅलेस), सांगली हायस्कूल, खण बंगला (आजचं मोतीबाग हे जिल्हाधिकारी निवासस्थान) इथपर्यंत प्रवासी वाहतूक चालत असावी, असं या भाडेपत्रकावरून ध्यानी येतं. परवान्याच्या मागील बाजूस परवाना शुल्क तक्ता, माल वाहून नेण्याची क्षमता आणि वाहतुकीची नियमावली दिली आहे.

शंभर वर्षांपूर्वीचे हे नियम असले तरी ते बैलगाडी आणि टांग्यासाठी आहेत, हे विशेष. जर हा परवाना गहाळ झाला तर दुसरा परवाना घेण्यासाठी पूर्ण शुल्क भरून घेतले जाईल, याचीही नोंद आढळते. अशा प्रकारच्या बारा नियमांसह असलेला परवाना जिल्हा पोलिसप्रमुखांनी स्वाक्षरीनिशी ९ ऑगस्ट, १९२० रोजी दिला आहे.

असे होते बारा नियम...

एकंदरीत, बारा नियम असून वाहन चालवताना हा परवाना जवळ ठेवावा आणि तो स्वच्छ असावा, याची जाणीव करून दिली आहे.

प्रवासी संख्या मोजताना कडेवरील मुलांस मोजणीत धरू नये आणि बारा वर्षांखालील दोन मुले मिळून एक इसम समजावा, असेही सांगितले आहे. चालक हा नीटनेटक्या पोषाखात असावा, त्याने नशापाणी करू नये, अशी ताकीदही दिली आहे. रात्रीच्या वेळी बैलगाडीस आणि टांग्यास ठळक ज्योतीचे दिवे लावले पाहिजेत. परवाना दिलेल्या दोन घोड्यांच्या गाडीस जुंपलेली घोडी ४८ इंचापेक्षा कमी उंचीची असू नयेत आणि जर ती गाडी एका घोड्याची असेल तर घोड्याची उंची ५० इंचापेक्षा कमी असू नये, असाही नियम नोंदवला आहे.