
खानापूरचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी कॉंग्रेसला "पूर्ण' सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी (ता. 13) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करतील.
आळसंद : खानापूरचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी कॉंग्रेसला "पूर्ण' सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी (ता. 13) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करतील. विटा नगरपालिका ताब्यात असलेल्या पाटील यांना सत्तेसोबत जुळवून घेण्याशिवाय पर्याय राहिलेले नाही. त्यांचा हा प्रवेश खानापूरचे शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्यासाठी त्रासाचा असला तरी इथल्या राष्ट्रवादीला बळकटी येणार आहे. सध्या बाबासाहेब मुळीक आणि सुशांत देवकर यांच्यापुरती मर्यादित असलेली राष्ट्रवादी व्यापक होणार आहे.
1980 मध्ये कॉंग्रेसकडून शहाजीबापू पाटील तर पुलोदकडून लोकनेते हणमंतराव पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली. यामध्ये पाटील हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. तेव्हापासून शरद पवारांच्या समवेत चांगले संबंध प्रास्थापित झाले होते. सदाशिव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने ते अधिक घट्ट होतील. 1995 राज्यात सत्तांतर होऊन भाजप शिवसेना युतीचे शासन सत्तेवर आले. विट्याच्या पाणी प्रश्नासाठी श्री. पाटील यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये गेले. 1999 ला शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची निर्मिती केली. श्री. पाटील यांचे राजकीय प्रतिस्पर्धी अनिल बाबर राष्ट्रवादीत गेले. सदाशिव पाटील तटस्थ राहिले. कॉंग्रेसकडून रामरावदादा पाटील तर राष्ट्रवादीकडून बाबर यांच्यात लढत झाली. त्यात बाबर यांना 52 हजार मते तर रामरावदादांना 25 हजार मते मिळाली. श्री. बाबर हे विजयी झाले.
2004 ला कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून अनिल बाबर विरुद्ध अपक्ष सदाशिव पाटील यांच्यात सामना रंगला. त्यात पाटील यांनी बाजी मारली. पाटील यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश न करता कॉंग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. मुख्यमंत्री विलासराव देशमुख व पालकमंत्री पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे केली. 2009 ला पुन्हा बाबर, पाटील सामना रंगला. यात पाटील यांनी बाजी मारली. मात्र पाटील यांनी त्यावेळी कॉंग्रेस मध्ये रितसर प्रवेश केला होता.
दरम्यान, श्री. पाटील यांचे गॉडफादर असलेले विलासराव देशमुख यांचे निधन झाले. तिथूनच सदाशिव पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला पीछेहाट निर्माण झाली. 2014 ला बाबर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.
श्री. पाटील कॉंग्रेसकडून लढले खरे, मात्र तालुक्यातील मोहनराव कदम यांच्या कार्यकर्त्यांनी बाबर यांना पडद्यामागून मदत केली. परिणामी, श्री. पाटील यांना पराभवास सामोरे जावे लागले. दहा वर्षांपासून सुरू असलेल्या कदम-पाटील कॉंग्रेस मधील अंतर्गत संघर्षाला पाटील यांनी तिलांजली देत राष्ट्रवादीशी दोस्ताना साधण्याचा निर्णय घेतला आहे. तो कितपत मतदारसंघाच्या पचनी पडतोय, हे येणारा काळच ठरवेल.
स्क्रीप्ट तयार होती, आता मुहूर्त लागला
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सदाशिवरावभाऊंनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी संजयकाकांशी जवळीक कमी केली आणि लोकसभेला आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यावेळी सदाभाऊंबाबतची स्क्रीप्ट तयार झाली होती. त्यांनी विधानसभेला जो सर्वपक्षिय अपक्ष प्रयोग केला, त्याची रचनाही पवारांच्या सूचनेनेच झाल्याचे बोलले गेले. तो प्रयोग फसला, मात्र पवारांचे नेतृत्व त्यांनी मान्य केले होते आणि आता त्यावर शिक्कामोर्तब होतोय.