
भयभीत झालेल्या अभयने मोटारसायकल तेथेच टाकून पळ काढला आणि आपला जीव वाचवला
देवराष्ट्रे (जि. सांगली ) : येथील सागरोबाच्या घाटात बिबट्याची दहशत असून, सोमवारी रात्री 8 च्या सुमारास रामापूर (ता. कडेगाव) येथील अभय शिरतोडे वय (27 ) या तरुणास समोरच बिबट्या दिसला. भयभीत झालेल्या अभयने मोटारसायकल तेथेच टाकून पळ काढला आणि आपला जीव वाचवला; पण या घटनेमुळे अभयचा रक्तदाब वाढल्याने त्याला तत्काळ खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अभय शिरतोडे हा युवक बोरगाव (ता. वाळवा) या ठिकाणी एका खासगी बॅंकेत सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला आहे. तो नेहमी कामाला जाण्यासाठी सागरेश्वर घाटातूनच जातो. सोमवारी (ता. 14) रोजी रात्री 8 च्या सुमारास कामावरून घरी जाताना सागरोबाच्या घाटातील खोल ओढ्याजवळ अभय आला. त्याला 15 फुटांच्या अंतरावर बिबट्या दिसला.
अभयला काही सूचेना. त्याच्या गाडीचा हॉर्न अचानक बंद पडला. त्याने गाडीची लाईट त्याच्या दिशेने मारली, तर बिबट्या त्याच्या गाडीच्या दिशेने येऊ लागला. तो ओरडू लागला. एवढ्यात चारचाकी गाडी पाठीमागून येत असल्याचे दिसले. अभयने दुचाकी सोडून दिली. गाडीकडे पळ काढला. चारचाकीतील लोकांनी त्याला गाडीत घेतले व तेथून सुरक्षित घाटावरती सोडले.
अभय भयभीत झाला होता. त्याची गाडीही घटनास्थळी सोडून आला होता. देवराष्ट्रे गावात आल्यावर त्याने मित्रांना ही घटना सांगितली व त्या ठिकाणी जाऊन गाडी आणली. भयभीत झाल्याने अभयचा रक्तदाब अचानक वाढला व त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.
दोन दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याने देवराष्ट्रे येथील तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. अशा घटना सतत घडत आहेत. मात्र वनविभागाचे अधिकारी गप्प आहेत. त्यामुळे नागरिक, शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
संपादन : युवराज यादव