त्या वटवृक्षाला वाचवण्यासाठी ही संस्था सरसालाली; आज करणार आंदोलन 

अजित कुलकर्णी
Wednesday, 15 July 2020

भोसे (ता. मिरज) येथील यल्लम्मा मंदिरानजीकचा विशालकाय वटवृक्ष राष्ट्रीय महामार्गात येत असल्याने त्याचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे.

सांगली : भोसे (ता. मिरज) येथील यल्लम्मा मंदिरानजीकचा विशालकाय वटवृक्ष राष्ट्रीय महामार्गात येत असल्याने त्याचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. याबाबत "सकाळ'ने छायाचित्र प्रसिध्द केल्यानंतर त्याच्या बचावासाठी ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी सरसावले आहेत. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई परिवाराने वटवृक्ष तसाच ठेवून त्याच्या शेजारुन रस्ता करावा, अशी मागणी करत आंदोलनाची हाक दिली आहे. बुधवार (ता. 15) रोजी सकाळी 11 वाजता वटवृक्षानजीक "चिपको आंदोलन' केले जाणार आहे. 

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे गावच्या हद्दीतील यल्लम्मा मंदिरानजीक सुमारे 300 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष उभा आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर अनेक पुरातन झाडांची कत्तल करण्यात आली. तानंग फाटा ते विठ्ठलवाडी गावच्या परिसरातील हजारो लहान-मोठी झाडे बळी पडली आहेत. शेकडो वर्षांपूर्वीच्या झाडांची कत्तल करण्यापूर्वी त्याचे पुर्नरोपण करता येण्यासारखे होते.

मात्र महामार्ग बांधणीसाठी नियुक्‍त कंपनीने झाडांचा फडशा पाडला आहे. तोडलेली झाडेही कुठे गेली, त्याचे काय झाले, त्याची वासलात कुठे लावली याचा कुणालाच पत्ता नाही. किमान मोठ्या झाडांबाबत कंपनीने पर्यावरणाचा विचार करुन निर्णय घेणे गरजेचे होते. यल्लम्मा मंदिरानजीकच्या वटवृक्षाशेजारीच मोठा पूल उभारला जात आहे. त्यामुळे नजीकच्या काळात या वृक्षाचाही बळी जाणार हे निश्‍चित आहे.

"सकाळ'ने सोमवार ता. 13 रोजीच्या अंकात वटवृक्ष अखेरची घटका मोजत असल्याचे सचित्र मांडले होते. त्याची दखल पर्यावरणप्रेमींनी घेत अभिनेते सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप यांच्याशी संपर्क साधून याची माहिती दिली. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sahyadri organization rushed to save the banyan tree; Will agitate today