esakal | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वेगवेगळ्या वाटांवर 43 ठिकाणी संरक्षण कुटी
sakal

बोलून बातमी शोधा

Shayadri Tiger Reserve

वन्य जीव विभागाने अत्यंत अद्ययावत सुविधा करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पाचही परिक्षेत्रात संरक्षण कुटी उभ्या केल्या आहेत. त्या संरक्षण कुटी द्वारे जंगलातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. त्याद्वारे शिकारी रोखल्य़ा जातीलच त्याशिवाय वृक्षसंवर्धनही केले जाईल. एक वनरक्षकासह दोन वनमजूर तेथे चोवीस तास ड्युटी करणार आहेत. 
- विनीता व्यास, उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वेगवेगळ्या वाटांवर 43 ठिकाणी संरक्षण कुटी

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड : कोकण किनापट्टीसह राधानगरीच्या पट्ट्यातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वेगवेगळ्या वाटांवर 43 ठिकाणी संरक्षण कुटी उभारल्या आहेत. व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पाचही वन परिक्षेत्रात सुमारे चार कोटींच्या अद्ययावत कुटी उभारण्यात आल्या आहेत. एका कुटीला सुमारे दहा लाखांचा खर्च आला आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात चोर वाटेने येणाऱ्या वृक्षतोड तस्करांसह श्वापदांच्या शिकारीही थांबण्यास मदत होणार आहे. कोकण किनार पट्टीवर गावातून येणाऱ्या पायवाटा अन् चोरट्या वाटांवर संरक्षक कुटी आहेत. त्यामुळे तेथील सगळ्या हालचालीवरही वन्यजीव विभागाची करडी नजर असणार आहे. तेथे चोवीस तास वन्य जीव विभागाचा कर्मचारी निवासी असणार आहे. रात्रीची गस्त घालण्यासह त्यांच्याकडे जीपीआरएस व अन्य अत्याधुनिक सुविधाही असणार आहेत. 

सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरीच्या सीमावर्ती जंगली भागात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. कोयना व चांदोलीचे राष्ट्रीय अभयारण्यात साकारणारा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चार जिल्ह्य़ांच्या सीमावर्ती भागाला घासून आहे. त्यात सगळ्यात जास्त भाग सातारा जिल्ह्याचा येतो. व्य़ाघ्र प्रकल्पाची भौगोलीक स्थिती अत्यंत अडचणीची आहे. सह्याद्री पर्वत रांगात साकारलेला हा प्रकल्प राज्यातील अन्य प्रकल्पापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे तेथील व्यवस्थापन करताना त्या भागातील भौगोलीक स्थितीचा अभ्यास करून सुविधा पुरवल्या जातात. त्यामुळे तेथील व्यवस्था करताना अनेकदा त्रुटीही राहत आहेत. त्या त्रुटींना दूर करण्यासाठी वन्य जीव विभागाने पाचही परिक्षेत्रात फिरून संरक्षक कुटी कुठे उभा करता येतील, याचा अभ्यास केला. त्याचा अहवाल सादर केला. त्यानंतर त्या कुटी उभा करण्यास परवानगी देण्यात आली.

व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक विनीता व्यास यांच्यासह व्याघ्र प्रकल्पातील अन्य अधिकाऱ्यांनी तो अहवाल तयार केला आहे. त्यामुळे तो अहवाल प्रत्यक्ष जंगलातील स्थीती लक्षात घेवून व प्रत्यक्ष गरज ओळखून तयार केला आहे. त्यामुळे त्या संरक्षण कुटींच्या जागा अत्यंत महत्वाच्या ठरल्या आहेत. व्याघ्र प्रकल्पात कोकणातील पायवाटा महत्वाच्या आहेत. सगळ्या बाजूने संरक्षण देता येते. कोकणातील व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्या वसलेल्या गावातून येणाऱ्या पायवाटा, राधानगरीच्या जंगलातून वर येणाऱ्या छुप्या वाटा अत्यंत जटील अन अवघड आहेत. त्या सापडतानाही मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे त्या वाटा आज अखेर मोकळ्या होत्या. त्या सगळ्या वाटांवर बहुतांशी ठिकाणी संरक्षण कुटी उभारण्यात आल्या आहेत. 

वन्य जीव विभागाकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली, ढेबेवाडी, हेळवाक, कोयना, बामणोली या परिक्षेत्रात 43 संरक्षक कुटी उभा केल्या आहेत. त्या कायमस्वरूपाच्या आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या नियंत्रण क्षेत्रात संरक्षणाच्या दृष्टीने नियक्षेत्रानुसार संरक्षण कुटी उभारण्यात आली आहे. त्या कुटीत चोवीस तास वन्यजीव विभागाचे कर्मचारी पहारा देत राहणार आहेत. ऊन, वारा पाऊस यापासून संरक्षण व्हावे, व्याघ्र प्रकल्पात प्रत्यक्ष जंगलात निवासाची सोय व्हावी व निवासाची सोय नसल्यामुळे ड्युटीत कमतरता येवू नये, याच उद्देशाने कुटी उभा केल्या आहेत. त्या प्रत्येक कुटीत एक वनरक्षक व दोन वनमजूर राहून तेथील संरक्षण करणार आहेत. त्यांच्यासाठी तेथे सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. चार खोल्यात त्या सुविधा आहेत. त्याशिवाय त्यांच्याकडे अद्यायावत यंत्रणाही देण्यात आली आहे. त्यात जीपीआरएससह शस्त्रेही अद्ययावत देण्यात आली आहेत. त्या संरक्षण कुटी आड मार्गावरून व्याघ्र प्रकल्पात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे श्वापदाच्या शिकारी करण्यासाठी येणाऱ्यांना रोखता येणार आहेच, त्याशिवाय अवैध वृक्षतोडही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न त्याद्वारे होणार आहे. त्यामुळे येथे उभा केलेल्या संरक्षण कुटी अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत. 

वन्य जीव विभागाने अत्यंत अद्ययावत सुविधा करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पाचही परिक्षेत्रात संरक्षण कुटी उभ्या केल्या आहेत. त्या संरक्षण कुटी द्वारे जंगलातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. त्याद्वारे शिकारी रोखल्य़ा जातीलच त्याशिवाय वृक्षसंवर्धनही केले जाईल. एक वनरक्षकासह दोन वनमजूर तेथे चोवीस तास ड्युटी करणार आहेत. 
- विनीता व्यास, उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

परिक्षेत्र निहाय संरक्षण कुटी 
वनपरिक्षेत्र               संरक्षण कुटी संख्या 
चांदोली                     11
ढेबेवाडी                     पाच 
हेळवाक                     14
कोयना                      11
बाममोली                    दोन 

loading image
go to top