VIDEO : शिर्डीत बाबांचे द्वार पहिल्यांदाच बंद, भाविकांना फक्त ऑनलाईन भेटणार

VIDEO : शिर्डीत बाबांचे द्वार पहिल्यांदाच बंद, भाविकांना फक्त ऑनलाईन भेटणार
Updated on

शिर्डी ः साईबाबा संस्थानने आज दुपारपासून साई मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अन्नछत्रही बंद ठेवले जाणार आहे. सरकारचा आदेश आलेला नाही. मात्र, साई संस्थानने स्वतःहून हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली.

गुरूवारी निघणार्या पालखी सोहळ्यात केवळ चार ते पाच पुजारी असतील. असे असले तरी ऑनलाईन दर्शन चालू राहणार आहे. संस्थानचे कार्यालयीन कामकाजही चालू राहणार आहे. मंदिर स्थापनेपासून पहिल्यांदाच अशी स्थिती उदभवली आहे.

"कोरोना'च्या धास्तीमुळे येथे येणाऱ्या भाविकांची गर्दी रोडावली आहे. दर्शनबारीत शुकशुकाट आणि बाजारपेठ ओस पडली. हॉटेलांतील खोल्यांचे आरक्षण रद्द होत आहे. येथून मोठ्या प्रमाणावर होणारे औरंगाबाद, नाशिक आणि शनिशिंगणापूरचे धार्मिक पर्यटन जवळपास थांबले आहे. शहराच्या अर्थकारणाला फार मोठा फटका बसतो आहे. छोटे-मोठे व्यावसायिक त्यात भरडून निघत आहेत. 

देश-विदेशातून येथे रोज तीस ते चाळीस हजार भाविक येतात. ही संख्या काल निम्म्याने कमी झाली. साईदर्शनासाठी भाविकांना बंदिस्त दर्शनबारीतून जावे लागते. रोज या सर्व भाविकांना मास्क पुरविणे संस्थानाला शक्‍य होत नाही. कारण, त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांना देण्यासाठीही पुरेसे मास्क नाहीत. बाजारपेठेत मास्कची टंचाई आहे. तोंडाला रुमाल बांधून बरेच भाविक दर्शनरांगेत उभे राहतात. काही रुमालदेखील न लावता "साई भरोसे' रांगेत उभे असतात. ठिकठिकाणी सॅनिटायझरच्या बाटल्या लावून त्यावरच समाधान मानण्याची वेळ संस्थान प्रशासनावर आली. "गर्दी करू नका' असे आवाहन यापूर्वीच करण्यात आले.

हे देवस्थान राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे आहे. मुख्यमंत्र्यांकडे हे खाते असल्याने ते याबाबतचा निर्णय घेतील, असे संस्थानाच्या वर्तुळातून सांगण्यात आले. 
बाजारपेठेत शुकशुकाट असल्याने दुकानांच्या भाड्यात मोठी घट झाली. तोटा होत असल्याने छोट्या व्यावसायिकांनी घरी बसणे पसंत केले आहे. दक्षिणेतील काही व्यावसायिक घरी परतू लागले. धार्मिक पर्यटन रोडावले. त्यामुळे सुमारे दीड हजारांहून अधिक खासगी प्रवासी वाहने जागेवर उभी आहेत. "कोरोना'च्या धास्तीमुळे बाहेरून आलेल्या प्रवाशांना घेऊन जाण्यास चालक घाबरत आहेत. एरवी साईसंस्थानाच्या धर्मशाळा, दर्शनबारी व बाजारपेठ भाविकांच्या गर्दीने सदैव गजबजलेली असते. सध्या शिर्डीत अघोषित संचारबंदी जाहीर केल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे

आरतीचे "व्हीआयपी' पास बंद 
"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर "देशातील सर्वाधिक गर्दीचे धार्मिक स्थळ' असा लौकिक असलेले साईमंदिर बंद ठेवायचे की कसे, याबाबतचा निर्णय अद्याप तरी झालेला नाही, अशी माहिती साईसंस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी "सकाळ'ला दिली. तथापि, याबाबत सरकारी पातळीवरून केव्हाही निर्णय जाहीर होऊ शकतो, असे सांगितले जाते. दरम्यान, साईमंदिरातील दिवसभरातील सर्व आरत्यांसाठी देण्यात येणारे "व्हीआयपी पास' काल सायंकाळपासून बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

विमानसेवेवरही परिणाम 
"कोरोना'चा प्रभाव येथील विमानसेवेवरदेखील पडला आहे. काल बंगळुरू येथून येणाऱ्या 89 आसनी विमानातून केवळ सात प्रवासी आले. आज दिल्ली येथून आलेल्या 189 आसनी विमानात केवळ पन्नास प्रवासी होते. प्रवाशांच्या संख्येत रोज घट होत आहे. आज ही संख्या साठ टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाली. 

श्रीरामनवमी उत्सवाबाबत अनिश्‍चितता 
पुढील पंधरवड्यात साईसंस्थानाचा श्रीरामनवमी उत्सव व यात्रा आहे. त्यावर अनिश्‍चिततेचे सावट आहे. ही यात्रा रद्द करावी लागेल, अशी ग्रामस्थांची मानसिकता झाली आहे. सरकारी अधिकारी आणि ग्रामस्थांच्या बैठकीत त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. या उत्सवासाठी प्रामुख्याने मुंबई येथून चाळीस ते पन्नास हजार पदयात्री साईंच्या पालख्या घेऊन येतात. त्यांनाही गर्दी न करण्याच्या सूचना साईसंस्थानाने दिल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com