सज्जनगड होतोय स्वच्छ अन्‌ सुंदरगड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

  स्वच्छता अभियानात स्वयंसेवकांनी 50 पोती प्लॅस्टिक कचरा केला जमा.

सातारा ः सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थान, पुणे येथील केशवसीता फाउंडेशन ट्रस्ट आणि साताऱ्यातील सागर मित्र मंडळाच्या वतीने सज्जनगडावर राबविलेल्या "सज्जनगड - सुंदरगड' अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नुकत्याच झालेल्या स्वच्छता अभियानात सज्जनगडावर कार्यकर्त्यांनी सुमारे 50 पोती प्लॅस्टिक कचरा जमा केला.
 
सज्जनगड स्वच्छ आणि सुंदर राहावा, यासाठी संस्थानच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. हा उपक्रम सातत्याने राबविला जाणार आहे. पुणे येथील केशवसीता फाउंडेशन ट्रस्ट आणि साताऱ्यातील सागर मित्र मंडळ, डोंबिवली येथील संतोष बुचके यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविली जात आहे. अनेक संस्था, स्वच्छताप्रेमी नागरिकही यामध्ये सहभागी होत आहेत. स्वयंस्फूर्तीने गडावर येऊन नागरिक स्वच्छता करत आहेत. संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी, भूषण स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच अभियान राबविण्यात आले.

त्यामध्ये गडावरील व्यवस्थापकापासून सेवेकऱ्यांपर्यंत सारे जण आणि शंभरहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. सज्जनगडावरील धाब्याच्या मारुतीपासून मुख्य दरवाजापर्यंतच्या सर्व परिसरात त्यांनी स्वच्छता केली. त्यामध्ये महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पन्नास पोती प्लॅस्टिक कचरा जमा करण्यात आला. हा कचरा एकत्र करून पुणे येथे विघटनासाठी पाठविला जाणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली. सज्जनगड कायम स्वच्छ आणि सुंदर राहावा, यासाठी सातत्याने हे अभियान राबविले जाणार असून, सर्व समाजिक, संस्था, नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sajjangad is getting clean and beautiful ; sanitation mission