सकाळ संवाद : बांबू लागवडीतून मिळवा उसाइतके उत्पन्न

जयसिंग कुंभार
Saturday, 30 January 2021

सांगली जिल्ह्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध संस्था संघटनांच्यावतीने औंदुबर ते म्हैसाळ या टप्प्यात कृष्णा नदीकाठाला बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम हाती घेतली जाणार आहे.

सांगली जिल्ह्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध संस्था संघटनांच्यावतीने औंदुबर ते म्हैसाळ या टप्प्यात कृष्णा नदीकाठाला बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम हाती घेतली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य बांबू विकास शासनाच्या बांबू जिल्हा समन्वयक अजितसिंह भोसले यांनी बांबू लागवड योजनेबाबत "सकाळ'शी साधलेला संवाद. 

प्रश्‍न ः बांबू लागवडीचे फायदे सांगा? 
श्री. भोसले : बांबू प्रजातीचे जीवनचक्र 40 ते 100 वर्षे असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्‍यकता नाही. बांबूला कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी शेतीसारखे नुकसान होत नाही. पाणी साचलेल्या जमिनीवर, क्षारयुक्त जमीन तसेच मुरमाड जमिनीवर सुद्धा बांबूची लागवड केली जाऊ शकते. इतर पिकांच्या तुलनेत बांबूच्या शेतीवर 30 ते 40 टक्के कमी खर्च येतो. बदलत्या हवामानाचा काहीही परिणाम होत नाही. पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे बांबू सोडून तिसऱ्या वर्षांनंतर बांबूचे शाश्वत उत्पन्न सुरू होते. पड-काळ्या जमिनीची शेतीची प्रत सुधारते. शेतकऱ्यांनी आपल्या पड क्षेत्रात दहा-वीस गुंठे लागवड करावी. दरवर्षी किमान शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत तयार होईल. 

प्रश्‍न : शासनाच्या यासाठी कोणत्या योजना आहेत? 
श्री. भोसले : केंद्राने अटल बांबू समृद्धी योजना लागू केली आहे. त्यानंतर राज्य सरकारने महाराष्ट्र बांबू विकास महामंडळामार्फत राज्यात आठ जातींच्या बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यात आणखी वाढ होत आहे. निरनिराळ्या हवामानांशी व पर्यावरणांशी जुळवून घेऊन वाढणाऱ्या अनेक जाती आहेत. सांगली जिल्ह्यात मानवेल. बाल्कोवा, तुरडा अशा जातींची लागवड झाली आहे. सांगलीसह पाच जिल्ह्यांचा समन्वयक म्हणून मी सध्या काम पाहतोय. गेल्या दोन वर्षांत तीनशे हेक्‍टर क्षेत्रावर दोनशे शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. त्यात जिल्ह्यात 30 शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. मिरज, पलूस, शिराळा, खानापूर, आटपाडी या तालुक्‍यांतील हे शेतकरी आहेत. 

प्रश्‍न : अनुदान कसे मिळते?
श्री. भोसले : सवलतीच्या दराने बांबू रोपे मिळवण्यासाठी अनुदान मिळते. बांबू विकास मंडळाकडे विहित नमुन्यात खालील दस्तावेजासह अर्ज करावा. रोपांसाठी दिले जाणारे अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग होते. ही सारी माहिती वनविभागाच्या कोणत्याही कार्यालयात उपलब्ध आहे. माझ्याशी 9673567007 या क्रमांकाशी थेट संपर्क साधा. महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या साईटवर जाऊनही माहिती मिळते. 

प्रश्‍न : सांगली जिल्ह्यात बांबू लागवडीला स्कोप आहे का?
श्री. भोसले : हस्तकला, शेती, फर्निचर, खाद्य, बांधकाम, विविध वस्तू, वाद्यनिर्मिती, कागद उद्योग यांच्यासाठी बांबूचा उपयोग होत आहे. येत्या काळात तो नक्की वाढेल. प्लायवुडसाठीही त्याचा वापर वाढणार आहे. सांगलीतील काही उद्योजकांशी करार केला तर तीन रुपये किलोप्रमाणे त्याला दर मिळू शकतो. सांगली जिल्ह्यात क्षारपड क्षेत्र मोठे आहे. अशा क्षेत्रात कर्नाळला मधुकर पाटील आणि त्यांच्या पाच शेतकऱ्यांनी पाच एकरांवर लागवड केली आहे. बुधगावला हणुमंत जाधव यांनी एकरावर लागवड केली आहे. त्यासाठी थोडी काळजी घेतली तर क्षारपडमध्येही बांबू येऊ शकतो.

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Samvad : Get enough income from bamboo cultivation