जिल्हा रुग्णालयात अडविला जात आहे पगार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

"एनआरएचएम' मधील ठराविक कर्मचाऱ्यांकडून मानसिक छळाचा आरोप.

सातारा : जिल्हा रुग्णालयातील खाबूगिरीचे प्रकरण चव्हाट्यावर आले असतानाच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या (एनआरएचएम) माध्यमातून नेमण्यात आलेल्या ठराविक कर्मचाऱ्यांचा पगार अडवून जाणीवपूर्वक मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप होत आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्‍यक बनले आहे. 

 

पारदर्शक कारभाराचा आव आणून जिल्हा रुग्णालयाचा कारभार हाकण्यात येत असल्याच्या दाव्यांचा फुगा अमित राजेवर झालेल्या लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे फुटला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व काही नियमात होत असल्याचा जो आव आणला जात होता, त्यालाही तडा गेला आहे. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी आत्मपरीक्षण करावे, असे म्हणण्यासारखी परिस्थिती नक्कीच निर्माण झाली आहे, असे कर्मचारी बोलत आहेत. काही कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा एक प्रकार नुकताच समोर आला आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये "एनआरएचएम'च्या माध्यमातून विविध विभागांसाठी सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, ठराविक अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप होत आहे. 15 कर्मचाऱ्यांना मागील महिन्यात कामाबाबतचा अहवाल मागविण्यात आला होता. त्यामध्ये आयुष, डीआयी, नर्सिंगचे कुक, सुरक्षा रक्षक, मसाजिस्ट, फिजिओथेरपिस्ट यांचा समावेश आहे. वरिष्ठांच्या सांगण्यानुसार सर्वांनी केलेल्या कामाचा तपशील त्यांना सादर केला. तोपर्यंत कर्मचाऱ्यांचा पगार थांबविण्यात आला होता. तो विलंबाने झाला.

या महिन्यातही मागचे पुढे... या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांना पुन्हा नोटीस काढण्यात आली. कामाचा तपशील सादर केला. रुग्णालयात येत असलेल्या रुग्णांची संख्या व त्यानुसार केले जाणारे काम याबाबतची माहिती सर्वांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना अहवालात सादर केली. परंतु, अहवाल योग्य फॉरमॅटमध्ये नाही, असे कारण सांगितले जात आहे. त्याच कारणातून संबंधितांचे पगार थांबविण्यात आले आहेत. यातील अनेकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. काहींना तर, साडेतीन ते सात हजार रुपये महिना पगार आहे. त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे पगार रखडल्यास देणी भागवायची कशी, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. त्यात सणासुदीच्या दिवसामध्ये कुटुंब आनंद ठेवण्यासाठी त्यांना उसनवारी व कर्जबाजारी व्हावे लागत आहे. 
 

दाद मागायची कोणाकडे? 

जिल्हा शल्यचिकित्सक हे सर्वांचे कुटुंबप्रमुख आहेत. परंतु, त्यांच्याकडूनच असा जाणीवपूर्वक त्रास झाल्यावर दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्‍न या कर्मचाऱ्यांना पडलेला आहे. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांच्या एकंदर कार्यपद्धतीबाबत चिंतन करत त्यात सुधारणा करण्याची आवश्‍यकता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salary is being stopped at the district hospital