मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू बंडखोरीच्या तयारीत

भारत नागणे
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

मागील काही वर्षापासून आवताडे आणि मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे सलोख्याच्या स्नेह वाढला आहे. सध्या सोलापूर जिल्हयात अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची  ओळख आहे. अशा वेळी आवताडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल असे गृहीत धरून त्यांनी गेल्या सहा महिन्यापासून निवडणूकीची तयारी सुरू केली आहे.

पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू म्हणून ओळखले जाणारे मंगळवेढा येथील बांधकाम व्यवसायिक समाधान आवताडे यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता असतानाच, ऐन वेळी मात्र पंढरपुरात माजी आमदार सुधाकर परिचारकांना रयत कांती संघटनेतून उमेदवारी जाहीर झाल्याने आवताडे यांनी बंडखोरीची तयार केल्याची चर्चा मतदार संघात सुरू आहे.

पंढरपूर विधानसभा मतदार संघावर आज पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. 2014 साली झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वर्चस्वाला आवताडे यांनी शह देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आमदार भारत भालके आणि प्रशांत परिचारक यांना आव्हान देत तब्बल 40 हजाराहून अधिक मते मिळवत शिवसेनेची ताकद दाखवून दिली होती.

त्यानंतर संत दामाजी साखर कारखाना, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीत आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. समाधान आवताडे यांच्या कामाची तडफ पाहून मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी ही त्यांना वेळोवेळी मदत केली आहे.

मागील काही वर्षापासून आवताडे आणि मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे सलोख्याच्या स्नेह वाढला आहे. सध्या सोलापूर जिल्हयात अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची  ओळख आहे. अशा वेळी आवताडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल असे गृहीत धरून त्यांनी गेल्या सहा महिन्यापासून निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. ऐन वेळी मात्र भाजपने विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांचे काका माजी आमदार सुधाकर परिचारक यांना ऐन वेळी उमेदवारी दिल्याने आवताडे समर्थकातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

याच संदर्भात उद्या आवताडे समर्थकांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत आवताडे अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा करतील अशी शक्यता आहे. त्याच राष्ट्रवादीचे भारत भालके आणि भाजप पुरस्कृत सुधारकर परिचारक हे दोन्ही उमेदवार पंढरपुरातील असल्याने मंगळवेढा तालुक्यातील मतदार कोणती भूमिका घेणार याकडेच  लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samadhan Avtade may be contest separately in Pandharpur