सुवर्ण सिंहासनासाठी मोदींनी मदत दिली तरी घेणार नाही - संभाजी भिडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

सोलापूर - काहीही झाले तरी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे 32 मण सोन्याचे सिंहासन स्थापन करण्यात येईल. यासाठी खेड्यापाड्यांमधील हिंदूंची मदत घेतली जाईल, मात्र सत्ताधाऱ्यांकडून मदत घेणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत दिली तरी घेणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज येथे सभेत केले. 

सोलापूर - काहीही झाले तरी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे 32 मण सोन्याचे सिंहासन स्थापन करण्यात येईल. यासाठी खेड्यापाड्यांमधील हिंदूंची मदत घेतली जाईल, मात्र सत्ताधाऱ्यांकडून मदत घेणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत दिली तरी घेणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज येथे सभेत केले. 

अक्कलकोट रस्त्यावरील श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य मठाच्या मैदानावरील सभेत ते बोलत होते. त्यांच्या शेकडो समर्थकांची सभेला उपस्थिती होती. पोलिसांनी सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. रायगडावर होणाऱ्या 32 मण सुवर्ण सिंहासन उपक्रमाविषयी भिडे यांनी सोलापूरकरांना मार्गदर्शन केले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका वेळी बसविण्यात आलेले 32 मणाचे सुवर्ण सिंहासन पुन्हा बसविण्याचा संकल्प देशभरातील तमाम शिवभक्तांनी 4 जून 2017 रोजी केल्याचे सांगून ते म्हणाले, महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी 27 वर्षांत 289 लढाया केल्या. महाराजांनी घेतलेली शपथ पूर्ण केली. आता आपल्याला सुवर्ण सिंहासनाचा संकल्प पूर्ण करायचा आहे. महाराजांचे व्रत जगणारा समाज आपल्याला हवा आहे. महाराजांनी भारतेमातेला दिलेले वचन आपल्याला पूर्ण करायचे आहे. आजवर अनेकांनी महाराजांविषयी पोवाडे लिहिले, चित्रपटे काढली, आता आपल्याला सिंहासन स्थापन करायचे आहे. 

आपल्या भाषणात भिडे यांनी रामायण, महाभारतातील प्रसंग सांगितले. माजी मंत्री (स्व.) पतंगराव कदम यांच्या कार्याचा उल्लेख करताना ते महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभले नाहीत, याबद्दल खंत व्यक्त केली. देशाचे नेतृत्व करेल, असा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, असे त्यांनी नमूद केले. 

काय म्हणाले संभाजी भिडे.. 
- माझ्या अटकेसाठी आंदोलन करणारे लोक अत्याचार करणाऱ्यांविरोधात आंदोलन का करत नाहीत? 
- महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना तत्काळ शिक्षा द्यायला हवी. 
- प्रतिष्ठा मिळविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला जात आहे. 
- ही सभा राजकीय नाही. 

रायगडावर 32 मण सोन्याचे सिंहासन स्थापन झाल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे महत्त्वाचे काम सुरू होईल. समाज निर्माणाचे काम हाती घेण्यात येईल. एका तालुक्‍यातील किमान दोन हजार शिवप्रेमी रोज रायगडावर पहारा देतील. हे काम अखंड चालू राहील यासाठी नियोजन सुरू आहे. 
- संभाजी भिडे, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sambhaji bhide talking narendra modi