धनगर समाजाच्या आरक्षण लढ्याला संभाजीराजेंचा पाठिंबा, मराठा आरक्षणा'साठी साथ देण्याची विनंती

नागेश गायकवाड
Saturday, 3 October 2020

धनगर समाजाच्या आरक्षण लढ्याला खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच मराठा आरक्षण लढ्यामागे धनगर समाजाने एकजुटीने राहावे, अशी विनंतीही केली आहे

आटपाडी (जि. सांगली ) : धनगर समाजाच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा द्या, अशी साद आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांना घातली होती. त्याला खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लढ्याला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच मराठा आरक्षण लढ्यामागे धनगर समाजाने एकजुटीने राहावे, अशी विनंतीही केली आहे. 

धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे (एसटी) आरक्षण द्यावे, यासाठी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर पाच वर्षे विविध माध्यमातून लढा देत आहेत. लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी राज्यभर समाजाचे अभूतपूर्व मेळावे घेऊन अखेरचा लढा पुकारला होता. आता पुन्हा एकदा एल्गार पुकारत पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासमोर त्यांनी "ढोल बजाव, सरकार जगाव' आंदोलन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि गावकुसाबाहेरील उपेक्षित घटकाला पहिल्यांदा आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपतींना आमदार पडळकर यांनी पत्र देऊन धनगर समाजाच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्याची साद घातली होती. 

या आवाहनाला खासदार संभाजीराजेंनी तत्काळ प्रतिसाद दिला आहे. श्री. पडळकर यांना पत्र पाठवून धनगर आरक्षण लढ्याला पाठिंबा जाहीर केला. आरक्षणासाठी राज्य आणि केंद्राबरोबर पत्रव्यवहार करण्याबरोबरच जे जे शक्‍य ते ते करण्याची ग्वाही दिली आहे. तसेच धनगर आरक्षणाच्या लढ्यात तुमच्यासोबत आहे. धनगर समाजानेही एकजुटीने मराठा आरक्षण लढ्यामागे उभे राहावे, अशी विनंती केली आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Raje's support to the reservation fight of Dhangar Samaj