सांगलीत याच दिवशी महाप्रलयाने हाहाकार माजला होता

flood
flood

सांगली ः सन 2019... 7 ऑगस्ट... महाप्रलयकारी महापुराने सांगलीला वेढले होते. सांगलीच्या गल्ल्या, मोहल्ले पोटात घेतले होते. हजारो लोक बेघर झाले होते. पुढचे पाच ते सात दिवस या महापुराने हाहाकार माजवला होता. डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहता होता. बुडलेली घरे बघून हृदय पिळवटून निघालं होतं. होत्याचं नव्हतं होताना बघून कृष्णा आणि वारणाकाठची सांगली आणि इथली 104 गावं सुन्न झाली होती. त्या घटनेला वर्ष झालं. अजूनही त्या वेदना संपलेल्या नाहीत. तो दुःखाचा महापूर आजही मनावर आघात करतोय. 

सन 2019 च्या महापुरानं सांगलीला फार मोठा फटका बसला. माणसाचं जगणं मुश्‍किल करून टाकलं. इथला व्यापार उद्‌ध्वस्त करून टाकला. सांगलीची शान असलेली गणपती पेठ, कापडपेठ, मारुती रोड, हरभट रोडं सारा पाण्यात होता. कृष्णा नदीनं उच्चांकी 57.7 फुट इतकी उंची आयर्विन पुलाजवळ गाठली होती. ना भूतो... असा तो प्रलय होता. काही लाख लोकं घरे सोडून बाहेर पडली होती. जगण्यासाठी धडपडत होती. हजारो लोक महापुराने चारही बाजूने पाहणी वेढलेले असताना आत अडकून पडली होती. त्यांना वाचवताना लष्कराच्या बोटी, महापालिका, जिल्हा प्रशासनाचे लोक जी धडपड करत होते त्याला सलामच... लोकांनी कुणाचं ऐकलं नाही. सन 2005 च्या महापुरात 53 फूट पाणी होते, तेंव्हा आमच्या घरात पाणी आलं नाही, आता काय येतंय, या भ्रमात लोक राहिले. तेथेच फसले. पाणी चार फुटानं वाढलं, घरात शिरलं. बाहेर पडायला जागा राहिली नाही. 


हा महापूर का आला, याची चौकशी करायला वडनेरे समिती नेमली. त्या समितीने बराच अभ्यास करून काही मुद्दे काढले. काही गोलगोल तिथेच फिरणारे होते, तर काही दीर्घकालीन उपाययोजना सुचवणारे. पण, एक गोष्ट स्पष्ट होती, काहीतरी चुकलंय. ती चूक अनेकांकडून झाली होती. ती चूक कोयना आणि अलमट्टी यो दोन धरणातील समन्वयाची होती, ती चूक कृष्णा नदीच्या पात्रात भर घालून इमारती उभारणाऱ्यांची होती आणि ती चूक महाप्रलय दारात असताना आत अडकून राहिलेल्या लोकांचीही होती. त्यातून धडा घेत लोक पुढे जाताहेत. वेदना आजही कायम आहेत. अनेकांनी जीवाभावाचे लोक गमावले त्या महापुरात. ब्रह्मनाळ या गावात बोट उलटली आणि सतरा लोक मृत्यूमुखी पडले. जीव वाचवायला म्हणून ते बोटीत चढले होते. इतका वेदनादायी अपघात होता तो, सुन्न झाले होते सारे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com