
Sangali : बाजार समित्यांची अंतिम मतदार यादी उद्या
सांगली : जिल्ह्यातील सांगली, तासगाव व आटपाडी बाजार समित्यांसाठी नावांत बदलासह दाखल झालेल्या १६ हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी सोमवारी (ता. २०) प्रसिद्ध होईल. यामुळे सात बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यातील सात बाजार समित्यांच्या अंतिम मतदारयादीचा कार्यक्रम सहकार विभागाने जाहीर केला आहे. यात एकूण २४ हजार मतदारांचा समावेश आहे. यात सांगली बाजार समितीचे साडेआठ हजार मतदार आहेत. सोसायटी गटातील सर्वाधिक दोन हजार ८१४ मतदार, ग्रामपंचायत दोन हजार ५३६, हमाल व तोलाईदार एक हजार ७६४, तर व्यापारी व अडते यांचे एक हजार ५२८ मतदार आहेत.
प्रारूप मतदार यादीवर १६ हरकती दाखल झाल्या होत्या. यात सांगली बाजार समितीसाठी सात हरकती, तासगाव चार, तर आटपाडीसाठी पाच हरकती दाखल झाल्या होत्या.
बहुतेक हरकती नावातील बदलांबाबतचा आक्षेप घेणाऱ्या होत्या. याबाबत सुनावणी घेण्यात आली असून, सर्व निकालात काढण्यात आल्या असल्याचे सहकार विभागातर्फे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका एप्रिलमध्ये होत आहेत. त्यात सांगली बाजार समिती राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजली जाते. मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यांत कार्यक्षेत्र आहे. त्याशिवाय आटपाडी, तासगाव या बाजार समित्याही राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. एप्रिलमध्ये बाजार समितीची निवडणूक होत असून, अंतिम प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध होईल.