अजबच ; झेडपीत एक "फुल', तीन "हाप'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

सांगली  जिल्हा परिषद सभापती निवडी आज बिनविरोध पार पडल्या. सुनीता पवार यांची महिला बालकल्याण समितीवर, प्रमोद शेंडगे यांची समाकल्याण समितीवर तर आशा सुनील पाटील आणि जगन्नाथ माळी यांची विशेष समितीवर निवड करण्यात आली. या चारपैकी केवळ सुनीता पवार या एकमेव भाजप सदस्या असून अन्य तीन सहयोगी पक्षांचे सदस्य आहेत.

सांगली   ः जिल्हा परिषद सभापती निवडी आज बिनविरोध पार पडल्या. सुनीता पवार यांची महिला बालकल्याण समितीवर, प्रमोद शेंडगे यांची समाकल्याण समितीवर तर आशा सुनील पाटील आणि जगन्नाथ माळी यांची विशेष समितीवर निवड करण्यात आली. या चारपैकी केवळ सुनीता पवार या एकमेव भाजप सदस्या असून अन्य तीन सहयोगी पक्षांचे सदस्य आहेत. त्यामुळे या निवडीत "एक फुल, तीन हाप', असे चित्र समोर आले आहे.

हे पण वाचा - खातेवाटप करताना भाजप नेत्यांमध्ये होणार... 

पीठासन अधिकारी म्हणून मिरजेचे प्रांत समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष सभा पार पडली. त्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह एकूण 15 जणांनी अठरा अर्ज दाखल केले होते. भाजप व सहयोगी पक्षाकडून सातजणांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा बैठक घ्यावी लागली. जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यात बैठक झाली. त्याला खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, गोपीचंद पडळकर, माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सम्राट महाडिक, सी. बी. पाटील, राहुल महाडिक आदी उपस्थित होते. तेथे चारजणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

हे पण वाचा - खेळाडूंसाठी खुषखबर ; "टबाडा' ठरणार वरदान

सकाळी 11 पासून एक तास अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दुपारी दोन वाजता अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली. त्यात 12 अर्ज माघारी घेण्यात आले, एक अर्ज अवैध ठरला. त्यामुळे चारही जागा बिनविरोध झाल्या, असे श्री. शिंगटे यांनी पत्रकारांनी बोलताना सांगितले. मतदान प्रक्रिया झाल्यास तयारी म्हणून मिरजेचे तहसीलदार रणजित देसाई आणि तासगावचे तहसीलदार कल्पना ढवळे यांना पाचारण करण्यात आले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पार पडली.

हे पण वाचा - अखेर `त्या ` यादीला ब्रेक;  महाविकास आघाडीचा पहिला दणका

यांनी घेतली माघार
संभाजी कचरे, विशाल चौगुले, संतपराव देशमुख, सरदार पाटील, अरुण बालटे, शरद लाड, महादेव दुधाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांनी ते मागे घेत बिनविरोधचा मार्ग मोकळा केला.

घोरपडे गट "चार्ज'
माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाची सातत्याने पीछेहाट सुरू होती, मात्र यावेळी त्यांनी शिवसेनेत असताना भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि तो फळाला आला. त्यांच्या समर्थक आशा सुनील पाटील यांचा सभापतिपद मिळाले, तेही विशेष समितीचे, हे विशेष. त्यामुळे घोरपडे गट रिचार्ज होईल, असे मानले जाते.

सभापतींचे परिचय
- सुनीता पवार ः महिला बालकल्याण सभापती सुनीता पवार या जत तालुक्‍यातील बनाळी मतदार संघाच्या सदस्य आहे. त्यांचे मूळ गाव सनमडी. त्या आमदार विलासराव जगताप यांच्या कट्टर समर्थक आहेत.
- जगन्नाथ माळी ः दिवंगत नानासाहेब महाडिक यांचे कट्टर समर्थक, शेतकरी संघटनेचे हाडाचे कार्यकर्ते आहेत. पेठ गटातून ते विजयी झाले. ते रयत विकास आघाडीतून विजयी झाले, आजही रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेत आहेत.
- प्रमोद शेंडगे ः मांजर्डे गटातून "नारळ' या चिन्हावर विजयी झाले. खासदार संजयकाकांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांचा परिचय आहे. सातत्याने चर्चेत सहभाग, आक्रमकपणे प्रश्‍न विचारण्याने ते नेहीम चर्चेत असतात.
- आशा पाटील ः रांजणी गटातून विजयी झाल्या. त्या अजितराव घोरपडे यांच्या कट्टर समर्थक असून "टेबल' या चिन्हावर विजयी झाल्या. त्यांचे मूळ गाव म्हैसाळ (एम) आहे. त्या उच्चशिक्षित असून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा आहे.

जगतापांचा संताप
जत तालुक्‍याला सभापतिपद मिळणार नाही, अशी चर्चा समोर आल्यानंतर माजी आमदार विलासराव जगताप यांनी संताप व्यक्त केला. मागील टर्ममध्ये जतला सभापतिपद होते, तेथे पुन्हा संधी नको, अशी काहींची भूमिका होती. त्यावर जगताप यांनी मिरज तालुक्‍यात पद होते तरीही येथे अध्यक्ष, उपाध्यक्षपद कसे दिले, हा मुद्दा पुढे करत आक्रमक पवित्रा घेतला. जत तालुक्‍यात सर्वाधिक भाजप सदस्य असल्याने संधी हवीच, ही भूमिका त्यांनी यशस्वीपणे रेटली.

जेवनावर बहिष्कार
जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यात दुपारी सदस्यांसाठी जेवनाचा बेत होता. त्यावर काही नाराज सदस्यांनी अप्रत्यक्ष बहिष्कार टाकला. काही सदस्य जेवनासाठी हॉटेलमध्ये गेले. खासदार संजयकाकांचे ते समर्थक मानले जातात. काकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र "आम्ही मतदानाला येतो, जेवायला बाहेर जातो', असा खोचक संदेश देत ही मंडळी बाहेर जेऊन आल्याचे सांगण्यात आले.

बालटेंचे बंड मागे
आटपाडी तालुक्‍यातील भाजपचे सदस्य अरुण बालटे यांना यावेळी सभापतिपद नक्की मिळेल, अशी अपेक्षा होती. अगदी सुरवातीच्या चर्चेत ते उपाध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतील, असेही चर्चेत होते, मात्र त्यांचा सभापतिपदासाठीही विचार झाला नसल्याने ते कमालीचे नाराज झाले. त्यांनी बंडाची तयारी केली होती, मात्र माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी त्यांना फोनवरून माघार घेण्यास सुचवले, त्यामुळे बालटेंचे बंड थंड झाले.

ठळक घडामोडी
राष्ट्रवादीचे "गायब' सदस्य भगवंत वाघमारे यांची हजेरी
कॉंग्रेसच्या वैशाली कदम घरगुती कारणाने अनुपस्थित
 शेंडगे यांच्या जल्लोषाला आटपाडीची हलगी वाजली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangali Zilla Parishad Chairman Selection