पूरकाळात राबलेल्यांचा तांबव्यातील संगम मंडळाने केला गौरव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

पूरकाळात राबलेल्या हातांचा गौरव तांबवे येथील संगम गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आला. त्यावेळी सत्कारमूर्ती व मंडळाचे कार्यकर्ते. 

तांबवे ः तांबवे गावाला यंदा महापुराने चारी बाजूने वेढा पडल्याने गावची बेटासारखी स्थिती झाली होती. त्यामुळे अनेकांना स्थलांतरित करावे लागले. मात्र, या पूरस्थितीत गावचा पाणीपुरवठा, वीज पुरवठा, समन्वय, सुरक्षितता ठेवून स्वच्छतेसाठी राबलेल्या हातांचा गौरव संगम गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आला. या वेळी सत्कारार्थींनी कष्टाचे चीज झाल्याच्या प्रतिक्रिया नोंदवल्या. 

तांबवे गाव पूरग्रस्त झाल्याने यंदा गणेशोत्सव शांततेत पार पडत आहे. मात्र, पुराच्या काळात ज्यांनी धाडसाने आपली कामगिरी बजावली, अशा कर्मचाऱ्यांचा, नागरिकांचा आणि अधिकाऱ्यांचा सत्कार संगम गणेश मंडळाने यावर्षी सर्व कार्यक्रम रद्द करून सामाजिक बांधिलकीतून केला. मंडळाने यंदा उत्सवही साधेपणाने साजरा केला आहे.

तांबवे गाव पुराच्या पाण्याने वेढलेले असताना त्या पाण्यातून पोहत जावून विजेचा शॉक लागू नये, यासाठी वीज पुरवठा खंडित करणारे अमोल शिंदे, पूरग्रस्तांसाठी धडपडणारे दिनेश मोगरे, पुरातही गावाला स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न करणारे आण्णासाहेब कुंभार, दादा पाटील, पोलिस पाटील पवन गुरव, पुरानंतर गावाच्या स्वच्छतेसाठी राबलेले सुभाष मदने, मौलासाब नदाफ यांचा सत्कार या वेळी मंडळाच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक अशोकराव भापकर यांच्या हस्ते करण्यात आला.

त्याचबरोबर पूरस्थितीतही गावात येऊन सुरक्षिततेसाठी झटणारे पोलिस उपनिरीक्षक भापकर यांचाही विशेष सन्मान या वेळी कऱण्यात आला. संगम मंडळाने सामाजिक भान ठेवून सत्कार घेत सामाजिक उत्तरदायित्व सिद्ध केले, असे गौरवोद्‌गार यावेळी श्री. भापकर यांनी काढले. ऍड. विजयसिंह पाटील यांनी प्रास्ताविक केले. विशाल पाटील यांनी आभार मानले. या वेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangam mandal honor those who helped in flodded area